जिल्हा हादरला! ४३ मजुरांना १४ दिवस डांबून वेठबिगारी; पुणे रेल्वे स्टेशनवरून आणून गुलामांसारखी वागणूक! मारहाण, शिवीगाळ अन् जिवे मारण्याच्या धमक्या; परंडा पोलिसांची धडक कारवाई, दोघांविरुद्ध मानवी तस्करी व वेठबिगार कायद्यानुसार गुन्हा दाखल!

यशश्री अपडेट्स | परंडा :

धाराशिव जिल्ह्यातील परंडा तालुक्यातून माणुसकीला काळीमा फासणारी आणि संपूर्ण जिल्हा हादरवून सोडणारी घटना समोर आली आहे. परंडा तालुक्यातील कौडगाव येथे तब्बल ४३ मजुरांना कामाचे आमिष दाखवून आणल्यानंतर सलग १४ दिवस डांबून ठेवत त्यांच्याकडून जबरदस्तीने काम करून घेतल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. रोज तब्बल १६ ते १७ तास काम करून घेणे, मजुरी मागितल्यास मारहाण करणे, शिवीगाळ करणे आणि जिवे मारण्याच्या धमक्या देणे, असे अमानवी प्रकार घडल्याचा आरोप आहे. या प्रकरणी परंडा पोलीस ठाण्यात दोन आरोपींविरुद्ध मानवी तस्करी आणि वेठबिगार पद्धतीचे उच्चाटन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुणे रेल्वे स्टेशनवरून कामाचे आमिष दाखवून मजुरांना आणले!

या प्रकरणातील फिर्यादी चंदू इंगाप्पा यतनाळकर (रा. विजापूर) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी शिवाजी सोमनाथ देवकर आणि समाधान अशोक पाडुळे (दोघेही रा. कौडगाव, ता. परंडा) यांनी फिर्यादीसह अन्य ४२ मजुरांना कामाचे आमिष दाखवून कामासाठी आणले. मजुरांना पुणे रेल्वे स्टेशनवरून आणून कौडगाव येथे ठेवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. सुरुवातीला काम आणि मजुरी मिळेल, अशी अपेक्षा घेऊन आलेल्या या मजुरांना मात्र प्रत्यक्षात वेठबिगारीच्या परिस्थितीला सामोरे जावे लागल्याचा आरोप आहे.

१४ दिवस पत्र्याच्या शेडमध्ये आणि घरात डांबून ठेवले!

दिनांक १७ ऑक्टोबर ते ३० ऑक्टोबर या कालावधीत ४३ मजुरांना पत्र्याच्या शेडमध्ये तसेच घरामध्ये डांबून ठेवण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. मजुरांना त्यांच्या इच्छेविरुद्ध थांबवून ठेवत दररोज पहाटे साडेसात वाजल्यापासून रात्री ११ वाजेपर्यंत काम करण्यास भाग पाडले जात असल्याचा आरोप आहे. म्हणजेच दररोज सुमारे १६ ते १७ तास मजुरांकडून काम करून घेतले जात होते.

मजुरी मागितली की मारहाण आणि जिवे मारण्याच्या धमक्या!

कामाचा मोबदला मागितल्यास आरोपींकडून मजुरांना मारहाण, शिवीगाळ आणि जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. विशेष म्हणजे, इतके दिवस कष्ट करूनही मजुरांना कोणताही मोबदला देण्यात आला नसल्याचा आरोप आहे. कामगारांना त्यांच्या इच्छेविरुद्ध रोखून ठेवून दबावाखाली काम करून घेतल्याचा हा प्रकार अत्यंत गंभीर मानला जात आहे.

३० ऑक्टोबरला परंडा पोलिसांची धडक; ४३ मजुरांची सुटका!

या घटनेची माहिती ३० ऑक्टोबर रोजी पहाटे मिळताच परंडा पोलिसांनी तातडीने कारवाई केली. पोलीस निरीक्षक चोरमले यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सिरसट, पोलीस उपनिरीक्षक बाते, ग्रेड पोलीस उपनिरीक्षक मुळे, हेड कॉन्स्टेबल खताळ, पोलीस अंमलदार जगदाळे आणि पोलीस नायक शेवाळे यांच्या पथकाने कौडगाव येथे छापा टाकला.

या कारवाईदरम्यान डांबून ठेवण्यात आलेल्या ४३ मजुरांची सुटका करण्यात आली. पोलिसांच्या या कारवाईमुळे वेठबिगारीच्या विळख्यात अडकलेल्या मजुरांना अखेर मुक्तता मिळाली.

कामगार विभागाचे पथकही घटनास्थळी दाखल!

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन सरकारी कामगार अधिकारी आसाराम गावंडे यांच्या पथकानेही घटनास्थळी भेट दिली. मजुरांची परिस्थिती आणि संबंधित प्रकाराची पाहणी करून पुढील कार्यवाही करण्यात आली.

दोघांविरुद्ध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल!

फिर्यादीच्या तक्रारीवरून शिवाजी सोमनाथ देवकर आणि समाधान अशोक पाडुळे या दोघांविरुद्ध मानवी तस्करी तसेच वेठबिगार पद्धतीचे उच्चाटन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास परंडा पोलीस करीत आहेत.

मजुरांच्या हक्कांवरच घाला!

कामाच्या शोधात गाव सोडून आलेल्या गरीब आणि गरजू मजुरांना कामाचे आमिष दाखवून आणणे, त्यांना डांबून ठेवणे, वेतन न देता दीर्घकाळ काम करून घेणे आणि विरोध केल्यास धमकावणे, असे आरोप समोर आल्याने या घटनेने मजुरांच्या सुरक्षिततेचा आणि त्यांच्या हक्कांचा प्रश्न ऐरणीवर आणला आहे.

४३ मजुरांची सुटका झाली असली तरी या प्रकरणातील सर्व बाबींची सखोल चौकशी होऊन दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई होणे आवश्यक आहे. कौडगावमधील या घटनेने परंडा तालुक्यासह संपूर्ण धाराशिव जिल्ह्यात खळबळ उडवली आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!