विधी महाविद्यालयात ३४ वर्षीय महिला विद्यार्थिनीचा पाठलाग; अश्लील शेरेबाजीप्रकरणी दोन विद्यार्थ्यांवर गुन्हा

यशश्री अपडेट्स | धाराशिव :

धाराशिव शहरातील डॉ. बापूजी साळुंखे विधी महाविद्यालयात कायद्याचे शिक्षण घेणाऱ्या ३४ वर्षीय महिला विद्यार्थिनीचा पाठलाग करून तिच्याशी अश्लील भाषेत शेरेबाजी करणे, मानसिक त्रास देणे तसेच तिच्या पतीला धक्काबुक्की केल्याच्या आरोपावरून दोन विद्यार्थ्यांविरुद्ध आनंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रबुद्ध गायकवाड आणि सुरज काशीद अशी गुन्हा दाखल झालेल्या दोघांची नावे आहेत.

धाराशिव शहरातील रहिवासी असलेली ३४ वर्षीय महिला विधी महाविद्यालयात कायद्याचे शिक्षण घेत आहे. ३० सप्टेंबर रोजी सकाळी सुमारे १०.३० वाजण्याच्या सुमारास ती नेहमीप्रमाणे महाविद्यालयात गेली होती. त्यावेळी महाविद्यालयातीलच प्रबुद्ध गायकवाड आणि सुरज काशीद या दोघांनी तिला विनाकारण त्रास देण्यास सुरुवात केल्याचे महिलेने दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे.

महिलेने संबंधित विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष करून त्यांच्याशी बोलणे टाळले. मात्र, ती आपल्याशी बोलत नसल्याचे लक्षात आल्यानंतरही आरोपींनी तिचा पाठलाग सुरूच ठेवल्याचा आरोप आहे. महाविद्यालयाच्या परिसरात तिच्या हालचालींवर लक्ष ठेवत तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

यावेळी आरोपींनी, “तुम्ही मला बोलत का नाही?” असे म्हणत तिच्याशी अश्लील भाषेत अपशब्द वापरल्याचा आरोप आहे. तसेच, “तुम्ही नाही बोललात तरी आम्ही बोलणारच, जोपर्यंत तुम्ही इतर मुलींप्रमाणे आमच्याशी फ्री राहणार नाही,” अशा स्वरूपाचे वक्तव्य केल्याचे महिलेने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

या प्रकारामुळे संबंधित महिला विद्यार्थिनीला मानसिक त्रास सहन करावा लागल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. महिलेने आरोपींच्या वर्तनाला विरोध केला असतानाही त्रास देणे सुरू राहिल्याचा आरोप करण्यात आला आहे. महाविद्यालयासारख्या शैक्षणिक परिसरात हा प्रकार घडल्याने या घटनेची चर्चा सुरू झाली आहे.

पतीलाही धक्काबुक्की केल्याचा आरोप

दरम्यान, या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर महिला विद्यार्थिनीचे पती महाविद्यालयात आले. त्यावेळी आरोपी विद्यार्थ्यांनी तिच्या पतीलाही धक्काबुक्की केल्याचा आरोप आहे. त्यामुळे प्रकरणाला आणखी गंभीर स्वरूप आले. महिलेने या संपूर्ण प्रकाराबाबत आनंदनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

विविध कलमांनुसार गुन्हा दाखल

महिलेच्या तक्रारीवरून आनंदनगर पोलिसांनी प्रबुद्ध गायकवाड आणि सुरज काशीद यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेतील कलम ६८, ११५(२), ३५१(२) आणि ३५१(३) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या कलमांनुसार पोलिसांकडून प्रकरणाचा तपास करण्यात येत आहे.

पोलिस निरीक्षक खांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे. घटनेची पार्श्वभूमी, संबंधित व्यक्तींचे जबाब तसेच उपलब्ध पुराव्यांच्या आधारे पोलिसांकडून पुढील कार्यवाही केली जात आहे.

दरम्यान, गुन्हा दाखल झाल्याने महाविद्यालयीन परिसरात विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेचा मुद्दाही चर्चेत आला आहे. मात्र, या प्रकरणातील आरोपांची सत्यता तपासाच्या निष्कर्षानंतरच स्पष्ट होणार असून, गुन्हा दाखल झालेल्या दोन्ही विद्यार्थ्यांवरील आरोप हे सध्या तक्रारीवर आधारित आहेत.

Leave a Reply

error: Content is protected !!