मराठा आरक्षणाचा उद्रेक; थेट तहसीलदारांची खुर्ची जाळली

मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा; उमरगा तहसील कार्यालयात आंदोलकांचा आक्रमक पवित्रा

यशश्री अपडेट्स | धाराशिव

मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाचा उद्रेक आता मराठवाड्यात अधिक तीव्र होताना दिसत आहे. अंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसलेल्या संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी उमरगा येथे बुधवारी (दि. ९) मराठा आंदोलकांनी आक्रमक आंदोलन केले.

बुधवारी सकाळी साडेनऊ ते दहा वाजण्याच्या सुमारास आंदोलकांनी थेट उमरगा तहसील कार्यालयात प्रवेश केला. यावेळी आंदोलकांनी तहसीलदारांच्या दालनातील खुर्ची बाहेर आणून प्रशासकीय आवारात जाळल्याची घटना घडली. या प्रकारामुळे तहसील कार्यालय परिसरात एकच खळबळ उडाली.

मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर शासनाने तातडीने निर्णय घ्यावा आणि मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्य कराव्यात, या मागणीसाठी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली. आंदोलनादरम्यान काही आंदोलक तहसीलदारांच्या दालनात घुसल्याचे सांगण्यात येत आहे.

खुर्ची बाहेर आणण्यास विरोध करणाऱ्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांशी आंदोलकांचा वाद झाल्याची माहिती असून, एका शिपायाला धक्काबुक्की झाल्याचाही आरोप करण्यात आला आहे. त्यानंतर आंदोलकांनी खुर्ची तहसील कार्यालयाच्या प्रशासकीय आवारात नेऊन पेटवून दिली.

या अचानक घडलेल्या घटनेमुळे तहसील कार्यालयात कामानिमित्त आलेल्या नागरिकांमध्ये काही काळ घबराटीचे वातावरण निर्माण झाले. परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रशासनाने आवश्यक ती खबरदारी घेतली.

मराठा आरक्षणाच्या मागणीवरून राज्यातील विविध भागांमध्ये आंदोलने सुरू असून, मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत आहे. उमरग्यातील या घटनेमुळे मराठा आंदोलनाचा आक्रमक पवित्रा पुन्हा एकदा समोर आला आहे.

दरम्यान, या प्रकरणात प्रशासनाकडून पुढे कोणती कारवाई केली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!