मनोज दादा जरांगे पाटील यांच्या प्रकृतीची चिंता; मराठा आरक्षणासाठी आंदोलनाला तीव्र स्वरूप
यशश्री अपडेट्स | सोलापूर
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाची तीव्रता आता महाराष्ट्रभर वाढताना दिसत आहे. अंतरवाली सराटी येथे सुरू असलेल्या संघर्षयोद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सोलापूर शहरातही मराठा सेवक आक्रमक झाले आहेत.
मनोज दादा जरांगे पाटील यांच्या प्रकृतीबाबत वाढती चिंता व्यक्त करत तसेच मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी सोलापूर शहरातील मराठा सेवकांनी अनोख्या पद्धतीने आंदोलन सुरू केले आहे. काही आंदोलक पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन करत असल्याची माहिती समोर आली आहे.
पाण्याच्या टाकीवरून आंदोलकांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आवाज उठविला असून, मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला आपला पूर्ण पाठिंबा असल्याचे स्पष्ट केले आहे. या आंदोलनामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.
मराठा आरक्षणाच्या मागणीवर तातडीने निर्णय घेण्यात यावा आणि मनोज दादा जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्य करण्यात याव्यात, अशी आंदोलकांची प्रमुख मागणी आहे.
दरम्यान, केवळ सोलापूरच नव्हे तर महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये मराठा समाजाच्या वतीने ठिकठिकाणी आंदोलने, निदर्शने आणि विविध प्रकारचे आंदोलन करण्यात येत आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला वाढता पाठिंबा मिळत असून, मराठा आरक्षणाचा प्रश्न पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणाच्या आणि सामाजिक चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे.
राज्यात ठिकठिकाणी मराठा आंदोलक आक्रमक भूमिका घेत असल्याने प्रशासनासमोरही परिस्थिती हाताळण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. सोलापुरातील पाण्याच्या टाकीवर सुरू असलेल्या या आंदोलनाकडे नागरिकांचे लक्ष लागले असून, आंदोलकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रशासनाकडून आवश्यक उपाययोजना केल्या जात आहेत.
