यशश्री अपडेट्स | पंढरपूर,
आषाढी वारीनिमित्त पंढरपूरकडे प्रस्थान केलेल्या श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे आज धर्मपुरी येथे अत्यंत भक्तिमय वातावरणात आणि टाळ-मृदंगाच्या गजरात जल्लोषात स्वागत करण्यात आले. राज्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी जिल्हा प्रशासनाच्या वतीने श्रींच्या पादुकांचे दर्शन घेऊन पूजन केले तसेच पुष्पहार अर्पण करून पालखीचे स्वागत केले. यावेळी सोलापूर जिल्हा प्रशासनाने पालखी रथावर पुष्पवृष्टी करत वारकऱ्यांचेही स्वागत केले.
स्वागत सोहळ्यानंतर पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी काही अंतर पालखीसोबत पायी चालत वारकऱ्यांच्या भक्तिभावात सहभाग घेतला. धर्मपुरी पालखीतळावर हजारो वारकरी, ग्रामस्थ आणि भाविकांनी मोठी गर्दी केली होती. “राम कृष्ण हरी”, “ज्ञानोबा माऊली, तुकाराम” या जयघोषाने संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. पोलीस बँड पथकाने भक्तिमय धून सादर करून पालखीचे स्वागत अधिक मंगलमय केले.
यावेळी जिल्हा प्रशासनाच्या वतीने श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे प्रमुख विश्वस्त ह.भ.प. भावार्थ देखणे महाराज यांचाही सत्कार करण्यात आला.
मान्यवरांची उपस्थिती

या कार्यक्रमास आमदार उत्तम जानकर, जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन, सातारा जिल्हाधिकारी संतोष पाटील, सोलापूरचे पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, साताऱ्याचे पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, माजी आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील, उपविभागीय अधिकारी विजया पांगारकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश कोपूरवाड, तहसीलदार सुरेश शेजुळ यांच्यासह दोन्ही जिल्ह्यांतील विविध विभागांचे अधिकारी व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वारकऱ्यांसाठी प्रशासनाची चोख व्यवस्था
धर्मपुरी पालखीतळावर वारकऱ्यांच्या सोयीसाठी जिल्हा प्रशासनाने व्यापक नियोजन केले आहे. पिण्याचे स्वच्छ पाणी, स्वच्छता, वैद्यकीय सुविधा, वीज, वाहतूक नियंत्रण आणि कायदा-सुव्यवस्था यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.
आरोग्य विभागाच्या वतीने वारकऱ्यांची प्राथमिक आरोग्य तपासणी सुरू असून, जिल्हा परिषदेने ‘हिरकणी कक्ष’ सज्ज ठेवला आहे. तसेच वारकऱ्यांच्या पायांना आराम मिळावा यासाठी फूट मसाज मशीनची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून हजारो भाविक त्याचा लाभ घेत आहेत. याशिवाय आरोग्य दूत आणि आरोग्य बाईक सेवाही वारकऱ्यांच्या आरोग्य सेवेसाठी तैनात करण्यात आल्या आहेत.
ठळक मुद्दे
- धर्मपुरी येथे संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे उत्साहात स्वागत.
- पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडून पादुका पूजन व पुष्पहार अर्पण.
- सोलापूर जिल्हा प्रशासनाकडून पालखी रथावर पुष्पवृष्टी.
- पालकमंत्री काही अंतर पालखीसोबत पायी चालले.
- “ज्ञानोबा माऊली, तुकाराम”च्या जयघोषाने परिसर दुमदुमला.
- पोलीस बँड पथकाकडून भक्तिमय धून सादर.
- वारकऱ्यांसाठी पाणी, आरोग्य, स्वच्छता, वाहतूक व सुरक्षा यांची चोख व्यवस्था.
- फूट मसाज मशीन, हिरकणी कक्ष, आरोग्य दूत आणि आरोग्य बाईकसारख्या विशेष सुविधा उपलब्ध.
