धाराशिवमध्ये नवोदित साहित्यिकांचा मेळावा; ३२ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन थाटात सुरू

यशश्री अपडेट्स-धाराशिव (प्रतिनिधी)

*साहित्यिक बिळात जाऊन बसले; समाजाच्या दुर्दशेला साहित्यिकच जबाबदार” – डॉ. शरद गोरे*

*साहित्यिकांनी समाजाच्या प्रश्नांवर बोलण्याची गरज व्यक्त_डॉ गोरे *
“सध्याच्या परिस्थितीवर साहित्यिक बोलत नाहीत. साहित्यिकांना सत्य मांडण्याची भीती वाटू लागली आहे. तुम्ही मेलेले आहात की जिवंत आहात, हा प्रश्न साहित्यिकांनी स्वतःला विचारला पाहिजे. समाजाच्या आजच्या दुर्दशेला साहित्यिकही तितकेच जबाबदार आहेत,” अशी खंत अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा ३२ व्या अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटक डॉ. शरद गोरे यांनी व्यक्त केली.
अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद आयोजित ३२ व्या अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन गुरुवारी धाराशिव येथील ‘लोकनेते अजितदादा पवार साहित्यनगरी’मध्ये उत्साहात झाले. ज्येष्ठ साहित्यिक प्रा. भास्कर चंदनशिव यांच्या नावाने उभारलेल्या ‘विचारपेठे’त आणि संतश्रेष्ठ गोरोबाकाका प्रवेशद्वारातून संमेलनस्थळी प्रवेश करत साहित्यप्रेमींनी मोठी उपस्थिती लावली.
यावेळी संमेलनाध्यक्ष डॉ. नंदकुमार राऊत, स्वागताध्यक्ष आमदार कैलास घाडगे पाटील, शिक्षक आमदार विक्रम काळे, कर्नाटक राज्याध्यक्ष रवींद्र पाटील, राष्ट्रीय उपाध्यक्ष शुभांगी काळभोर, राष्ट्रीय विश्वस्त गुरू भांगे, अनिल अनुभुळे, राष्ट्रीय खजिनदार फुलचंद नागटिळक, मुख्य संयोजक ज्ञानेश्वर पतंगे, परमेश्वर पालकर, तुकाराम गंगावणे, जिल्हाध्यक्ष प्रा. राजा जगताप, महिला जिल्हाध्यक्ष मीना महामुनी आदी मान्यवर उपस्थित होते.
डॉ. गोरे म्हणाले, “एक काळ असा होता की साहित्यिक वाघासारखे गर्जत होते; आज साहित्यिक बिळात जाऊन बसले आहेत. शेतकरी आत्महत्या करतोय, सामान्य माणूस संकटात आहे; मात्र साहित्यिक त्यावर भाष्य करताना दिसत नाहीत. बहुतांश साहित्यिक भौतिकवादात अडकले असून वास्तवापासून दूर गेले आहेत. साहित्यिकांनी तुकोबाराय आणि महात्मा फुले यांच्या सत्यविचारांच्या मार्गाने समाजाच्या प्रश्नांवर निर्भीडपणे बोलले पाहिजे.”
साहित्यिकांना मिळणारी पाच हजार रुपयांची मासिक पेन्शन किमान ३० हजार रुपये करण्यात यावी, तसेच साहित्यिकांसाठी स्वतंत्र ‘साहित्य सहजीवन’ वसाहत उभारून त्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना सर्व आरोग्य सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.
कैलास पाटील यांचे तोंडभरून कौतुक
आमदार कैलास घाडगे पाटील हे आजच्या राजकारणातील “राजहंस” असून इतर राज्यकर्त्यांनी त्यांचे अनुकरण करण्याची गरज आहे, असे गौरवोद्गार डॉ. गोरे यांनी काढले. साहित्यावर प्रेम करणारे आणि सुसंस्कृत राजकारण करणारे लोकप्रतिनिधी प्रत्येक तालुक्यात असतील तर महाराष्ट्र बदलायला वेळ लागणार नाही, असेही ते म्हणाले.
भास्कर चंदनशिव यांना मरणोत्तर जीवनगौरव
ज्येष्ठ ग्रामीण साहित्यिक प्रा. भास्कर चंदनशिव यांना मरणोत्तर ‘साहित्य जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. त्यांच्या पत्नी कमलताई चंदनशिव यांनी पुरस्कार स्वीकारला. ५१ हजार रुपये रोख, मानपत्र, स्मृतिचिन्ह आणि शाल असे पुरस्काराचे स्वरूप होते.
परिवहन विभागात मराठी सक्तीचा निर्णय घेतल्याबद्दल राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा विशेष सन्मानही यावेळी करण्यात आला.
विविध क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव
किशोर टिळेकर यांना ‘संत तुकाराम महाराज साहित्यरत्न’, साक्षी जमादार यांना ‘सावित्रीबाई फुले युवा साहित्यरत्न’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच पत्रकारितेतील उल्लेखनीय कार्याबद्दल दत्तात्री भोंगळे, विनोद राऊत आणि गणेश मोरे यांना ‘तानुबाई बिर्जे राज्यस्तरीय पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले. सामाजिक कार्यासाठी शहाजी पाटील आणि अनुजा प्रसाद मोहिते यांचाही गौरव करण्यात आला.
ग्रंथ प्रकाशन सोहळा
या संमेलनात ‘महाराष्ट्राचे शिल्पकार लोकनेते अजितदादा पवार’ या काव्यगौरव ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. डॉ. शरद गोरे यांनी या ग्रंथाचे संपादन केले आहे. याशिवाय तुकाराम गंगावणे लिखित ‘मराठवाडा मुक्तीचे झुंजार सेनानी’, किशोर टिळेकर यांचे ‘राजकारण व पुढारी’, सूर्यकांत मामुगडे यांचे ‘कबीर वाणी’ आणि प्रा. नंदकुमार बालूरे लिखित ‘विश्वकवी उमेश शेकडे’ या ग्रंथांचेही प्रकाशन झाले.
उद्घाटन सोहळ्यास साहित्यिक, कवी, लेखक आणि रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *