यशश्री अपडेट्स-परांडा( प्रतिनिधी) : परांडा तालुक्यातील कपिलापुरी गावावर काल दुःखाचा डोंगर कोसळला. नदीतील मोटरचा विजेचा शॉक बसल्याने श्री. अनिल देवळकर आणि श्री. अक्षय कुंभार यांचे दुर्दैवी निधन झाले. या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण गाव शोकमग्न झाले असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. धाराशिव जिल्ह्यातील परंडा तालुक्यातील कपीलापुरी येथे शुक्रवारी सायंकाळी अत्यंत दुर्दैवी घटना घडली. शेतातील विद्युत पंप पाण्यातून बाहेर काढत असताना विजेचा तीव्र शॉक लागून दोन शेतकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण गावासह परिसरात शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कपीलापुरी येथील शेतकरी अनिल श्रीधर देवळकर (जैन) यांच्या शेतातील विद्युत पंपामध्ये तांत्रिक बिघाड झाला होता. सदर पंप पाण्यातून बाहेर काढण्यासाठी अनिल देवळकर आणि अक्षय बिभीषण कुंभार हे दोघे पाण्यात उतरले होते. यावेळी अचानक विद्युत प्रवाहाचा तीव्र शॉक लागल्याने दोघेही गंभीर जखमी झाले. आसपासच्या नागरिकांनी तत्काळ मदतीसाठी धाव घेतली; मात्र दोघांचाही जागीच मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले.
ही घटना शुक्रवार दि. २९ मे रोजी सायंकाळी सुमारे ६ वाजण्याच्या दरम्यान घडली. घटनेची माहिती मिळताच पोलिस पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून पुढील कार्यवाही सुरू केली आहे.
अक्षय कुंभार हा मदतीसाठी सदैव तत्पर असणारा, कोणाच्याही कामाला कधीही नकार न देणारा आणि सर्वांना आपलेसे वाटणारा युवक म्हणून परिचित होता. त्याच्या मनमिळाऊ स्वभावामुळे त्याने गावातील अनेकांची मने जिंकली होती.
तर अनिल देवळकर हे नम्र, शांत आणि सर्वांशी आपुलकीने व आदराने वागणारे व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या साधेपणा, प्रेमळ स्वभाव आणि सामाजिक जिव्हाळ्यामुळे त्यांनी गावकऱ्यांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले होते.
दोन उमदे, कर्तृत्ववान आणि मेहनती युवकांच्या अशा अकाली निधनाने कपिलापुरी गाव शोकसागरात बुडाले आहे. त्यांच्या जाण्याने गावाने दोन गुणी, कष्टाळू आणि सर्वांना आपलेसे वाटणारे चेहरे गमावले आहेत. आज गावात शोककळा पसरली असून सर्व स्तरांतून दोघांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे.

