यशश्री अपडेट्स | परंडा प्रतिनिधी
परंडा तालुक्यातील साकत (बु.)–पिस्तमवाडी ग्रुप ग्रामपंचायतीअंतर्गत विविध विकासकामे प्रत्यक्षात न करता तब्बल १८ लाख ५ हजार रुपयांच्या शासकीय निधीचा अपहार झाल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित सरपंच, तत्कालीन ग्रामसेवक व इतर जबाबदार व्यक्तींवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
साकत (खु.) येथील तुषार बापूराव फरतडे आणि आबा सोपान जाधव यांनी ११ जून रोजी गटविकास अधिकारी व तहसीलदार यांच्याकडे दिलेल्या निवेदनात हा आरोप केला आहे. निवेदनानुसार, ग्रामपंचायत हद्दीतील विविध विकासकामांवर मोठ्या प्रमाणात खर्च दाखविण्यात आला असला तरी अनेक कामे प्रत्यक्षात झालेली नसल्याचा दावा करण्यात आला आहे.
तक्रारीत नमूद केल्यानुसार, सौर पंप दुरुस्ती, अंगणवाडी खर्च, घनकचरा व्यवस्थापन, सार्वजनिक कट्टे, शाळा शौचालय, ई-लर्निंग साहित्य, एलईडी दिवे, शाळा साहित्य, स्ट्रीट लाईट, सार्वजनिक स्वच्छता आणि पाणीपुरवठा यांसारख्या विविध कामांवर लाखो रुपयांचा निधी खर्च झाल्याची नोंद आहे. मात्र, प्रत्यक्ष पाहणी केल्यास अनेक कामे अस्तित्वात नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.
तक्रारदारांनी या प्रकरणातील मोजमाप पुस्तिका (एमबी), बिले, व्हाउचर्स, ठराव, काम पूर्णत्व प्रमाणपत्रे यांची तपासणी करून प्रत्यक्ष स्थळ पाहणी करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. चौकशीत आर्थिक गैरव्यवहार सिद्ध झाल्यास संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करावी, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, प्रशासनाने तक्रारीची तातडीने दखल घेऊन चौकशी सुरू केली नाही तर पंचायत समिती परंडा कार्यालयासमोर बेमुदत उपोषण आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही तक्रारदारांनी दिला आहे.
या तक्रारीमुळे साकत परिसरात मोठी खळबळ उडाली असून, गावाच्या विकासासाठी आलेला १८ लाख रुपयांचा शासकीय निधी नेमका कुठे खर्च झाला? असा प्रश्न ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे. आता प्रशासन या प्रकरणात कोणती भूमिका घेते आणि चौकशीत काय निष्पन्न होते, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
साकत ग्रुप ग्रामपंचायतीत १८ लाखांच्या निधी अपहाराचा आरोप; चौकशीसह गुन्हे दाखल करण्याची ग्रामस्थांची मागणी”
