मुगावमध्ये तरुणावर अमानुष अत्याचार; लोखंडी रॉड घुसवून जिवे मारण्याचा प्रयत्न

यशश्री अपडेट्स | परंडा प्रतिनिधी

परंडा तालुक्यातील मुगाव येथे २३ वर्षीय तरुणावर तिघांनी जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पार्टीदरम्यान झालेल्या वादातून आरोपींनी तरुणाला लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली. एवढ्यावरच न थांबता त्याच्या पार्श्वभागात रॉड घुसवून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित तरुण १० जून रोजी सायंकाळी काही मित्रांसह गावाजवळील एका हॉटेलमध्ये पार्टीसाठी गेला होता. यावेळी मद्यपानानंतर त्यांच्यात वाद झाला. हा वाद विकोपाला गेल्यानंतर तिघांनी मिळून तरुणावर हल्ला चढवला. लोखंडी रॉडने मारहाण करत आरोपींनी अमानुषतेचा कळस गाठल्याचे सांगितले जात आहे.

गंभीर जखमी झालेल्या तरुणाला सुरुवातीला परंडा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी धाराशिव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलविण्यात आले आहे. सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

दरम्यान, या घटनेमुळे मुगाव व परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. आंबी पोलिस ठाण्याचे पथक प्रकरणाचा तपास करत असून, संबंधित आरोपींना तातडीने अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणी नातेवाईक व ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

वाढत्या गुन्हेगारीमुळे चिंता

आंबी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील काही गावांमध्ये अलीकडच्या काळात गुन्हेगारीच्या घटना वाढताना दिसत आहेत. मुगाव येथील या अमानुष प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, नव्याने पदभार स्वीकारलेले सहाय्यक पोलिस निरीक्षक अर्जुन चौधर हे वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी कोणती ठोस पावले उचलतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!