भूम तालुक्यात अंधश्रद्धेचा बाजार? व्हिडिओ व्हायरल होताच खळबळ

धाराशिव | यशश्री अपडेट्स प्रतिनिधी
धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यातील शेकापूर येथे असाध्य आजार, भुतबाधा आणि विविध व्याधी बऱ्या करण्याच्या नावाखाली नागरिकांची आर्थिक व मानसिक फसवणूक केली जात असल्याचा आरोप समोर आला आहे. यासंदर्भातील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शेकापूर येथे दर शनिवारी एका तथाकथित बाबाचा दरबार भरत असून, येशूच्या प्रार्थनेच्या माध्यमातून भुतबाधा, दैवी कोप तसेच गंभीर आजार कायमस्वरूपी दूर केले जात असल्याचा दावा केला जातो. या दाव्यांवर विश्वास ठेवून धाराशिव, सोलापूर आणि बीड जिल्ह्यातील अनेक नागरिक येथे मोठ्या संख्येने येत असल्याचे सांगितले जाते.
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये संबंधित बाबा महिला व पुरुषांना संमोहनासारख्या पद्धतीने प्रभावित करत असल्याचे दिसून येत आहे. तसेच अवघ्या १० रुपयांचे खोबरेल तेल आणि बाटलीबंद पाणी देऊन विविध आजारांवर उपचार होत असल्याचा दावा केला जात असल्याचेही आरोप आहेत.
अंधश्रद्धेचा आधार घेत नागरिकांची दिशाभूल करून त्यांची फसवणूक केली जात असल्याची चर्चा परिसरात सुरू असून, संबंधित प्रकाराची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
दरम्यान, व्हायरल व्हिडिओची सत्यता आणि संबंधित दाव्यांची अधिकृत पुष्टी होणे अद्याप बाकी आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!