कळंब ड्रग्ज तस्करी प्रकरणात आरोपींची संख्या पाचवर; एकाला वाढीव पोलीस कोठडी, तिघांची कारागृहात रवानगी

यशश्री अपडेट्स | धाराशिव

कळंब येथील एमडी ड्रग्ज तस्करी प्रकरणाचा तपास जसजसा पुढे सरकत आहे, तसतसे या प्रकरणातील धक्कादायक बाबी समोर येत आहेत. या गुन्ह्यातील आरोपींची संख्या आता पाचवर पोहोचली असून, एका आरोपीला वाढीव पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे, तर दुसऱ्या आरोपीची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. दरम्यान, तपासादरम्यान आणखी एका आरोपीची निष्पत्ती झाली असून, त्याला अटक करण्यासाठी पोलिसांचे पथक रवाना करण्यात आल्याची माहिती आहे.

अक्षय रिटेला २० ऑगस्टपर्यंत वाढीव पोलीस कोठडी

कळंब ड्रग्ज तस्करी प्रकरणातील आरोपी अक्षय रिटे याला न्यायालयाने २० ऑगस्टपर्यंत वाढीव पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिसांकडून त्याची कसून चौकशी सुरू असून, या चौकशीतून ड्रग्जचा पुरवठा, आर्थिक व्यवहार आणि या रॅकेटशी संबंधित इतर व्यक्तींची माहिती मिळविण्याचा प्रयत्न सुरू आहे.

तर लखन गायकवाड याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्याने त्याची धाराशिव येथील जिल्हा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.

आणखी एक आरोपी निष्पन्न; अटकेसाठी पोलिसांचे पथक रवाना

तपासादरम्यान पोलिसांना आणखी एका संशयित आरोपीचा सहभाग निष्पन्न झाल्याची माहिती समोर आली आहे. संबंधित आरोपीला ताब्यात घेण्यासाठी पोलिसांचे पथक रवाना झाले असून, त्याला अटक केल्यानंतर या ड्रग्ज तस्करीच्या साखळीतील आणखी माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

या प्रकरणात आतापर्यंत निखिल युवराज जाधव, अरविंद दादाराव कांबळे आणि लखन गायकवाड या तिघांची कारागृहात रवानगी झाली आहे. तर अक्षय रिटे याची पोलीस कोठडीत चौकशी सुरू आहे.

११.२१ ग्रॅम एमडी ड्रग्ज; ‘कमर्शियल क्वांटिटी’चा मुद्दा महत्त्वाचा

या कारवाईत पोलिसांनी एकूण ११.२१ ग्रॅम वजनाच्या २९ पुड्या एमडी ड्रग्ज जप्त केल्या आहेत. पोलिसांच्या तपासानुसार जप्त करण्यात आलेले ड्रग्ज हे व्यावसायिक (Commercial) प्रमाणाच्या श्रेणीत येत असल्याचा मुद्दा या प्रकरणात महत्त्वाचा ठरत आहे.

व्यावसायिक प्रमाणातील अमली पदार्थ आढळल्याने संबंधित आरोपींविरुद्धचा कायदेशीर गुन्हा अधिक गंभीर स्वरूपाचा ठरू शकतो. त्यामुळे आरोपींच्या जामीन प्रक्रियेसह पुढील कायदेशीर बाबींमध्येही अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

बँक खाती, आर्थिक व्यवहार आणि CDR तपासाच्या केंद्रस्थानी

पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास केवळ जप्त केलेल्या ड्रग्जपुरता मर्यादित न ठेवता त्यामागील संपूर्ण नेटवर्क शोधण्याच्या दृष्टीने सुरू आहे. आरोपींची बँक खाती, आर्थिक व्यवहार, कॉल डिटेल रेकॉर्ड (CDR), संपर्कातील व्यक्ती आणि इतर उपलब्ध पुरावे तपासले जात आहेत.

ड्रग्जची खरेदी-विक्री, पैशांची देवाणघेवाण आणि आरोपींच्या संपर्कातील व्यक्ती याबाबत पोलिसांकडून माहिती गोळा केली जात आहे. या तपासातून या प्रकरणामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा शोध घेतला जात आहे.

४ ऑगस्ट रोजी स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई

या प्रकरणाची सुरुवात ४ ऑगस्ट रोजी धाराशिव पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने केलेल्या कारवाईतून झाली. पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेत त्यांच्याकडून एमडी ड्रग्ज जप्त केले होते.

कारवाईदरम्यान ११.२१ ग्रॅम एमडी ड्रग्जच्या २९ पुड्या पोलिसांच्या हाती लागल्या. तसेच ड्रग्ज आणि दुचाकीसह एकूण १ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जप्त केलेल्या ड्रग्जची किंमत सुमारे ५५ हजार रुपये असल्याची माहिती आहे.

आरोपींना रंगेहात पकडण्यात आल्याने तपासाला महत्त्वाची दिशा मिळाली आणि त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणातील इतर आरोपींचा शोध सुरू केला.

पोलिसांकडून ड्रग्ज नेटवर्कचा कसून तपास

या प्रकरणाचा तपास पोलीस अधीक्षक रितू खोखर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार आणि कळंब पोलीस ठाण्याचे अधिकारी तपासाची पुढील दिशा ठरवत आहेत.

दरम्यान, या प्रकरणातील आरोपींची संख्या वाढत असल्याने कळंब परिसरातील ड्रग्ज पुरवठ्याचे नेटवर्क किती मोठे आहे, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पोलिसांच्या तपासातून ड्रग्जचा स्रोत, पुरवठादार, ग्राहक आणि आर्थिक व्यवहारांची साखळी उघड होण्याची शक्यता आहे.

पोलिस पथकाची उल्लेखनीय कामगिरी

ही कारवाई पोलीस अधीक्षक रितू खोखर यांच्या मार्गदर्शनाखाली, अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार, सपोनि खटके, कळंब पोलीस ठाण्याचे सपोनि मगर, पोहेकॉ राठोड, पोहेकॉ जानराव, पोहेकॉ गादेकर, पोहेकॉ जाधवर, पोहेकॉ चौरे, पोना जाधवर, पोना ढगारे, पोअं मुंगळे, पोहेकॉ शेख, पोहेकॉ माळवे, पोअं बोईनवाड, पोहेकॉ आरब, चापोहेकॉ माने यांच्यासह पोलिस पथकाने ही कारवाई केली.

कळंब ड्रग्ज प्रकरणाचा तपास अद्याप सुरू असून, आणखी आरोपी निष्पन्न होतात का आणि या ड्रग्ज रॅकेटचे धागेदोरे कुठपर्यंत पोहोचतात, याकडे आता धाराशिव जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!