यशश्री अपडेट्स | कळंब (प्रतिनिधी) :
कळंब शहरातील तहसील कार्यालयासमोरील चौकाला ‘क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले चौक’ असे नामकरण करण्यात आल्यानंतर आता या चौकाच्या सुशोभीकरणाला आणि सामाजिक-सांस्कृतिक महत्त्वाला नवी दिशा मिळाली आहे. चौकात उभारण्यात आलेल्या क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या भव्य शिल्पाचे अनावरण १५ ऑगस्ट रोजी धाराशिव-कळंब विधानसभा मतदारसंघाचे आमदार कैलास पाटील यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले.
महात्मा फुले यांच्या सामाजिक समता, शिक्षण, स्त्री शिक्षण आणि शोषित-वंचितांच्या हक्कांसाठीच्या कार्याला अभिवादन म्हणून उभारण्यात आलेल्या या शिल्पामुळे कळंब शहराच्या सौंदर्यात भर पडली असून, चौकाला ऐतिहासिक आणि सामाजिक महत्त्व प्राप्त झाले आहे.
कृती समितीच्या पाठपुराव्याला यश
कळंब शहरातील तहसील कार्यालयासमोरील चौकाला महात्मा फुले यांचे नाव देण्यात यावे, या मागणीसाठी महात्मा फुले चौक कृती समितीच्या वतीने मागील वर्षी नगरपालिकेकडे निवेदन देण्यात आले होते. या निवेदनासोबत शहरातील सर्वपक्षीय तालुकाध्यक्ष तसेच सामाजिक चळवळीत कार्यरत विविध संघटनांची समर्थनपत्रे जोडण्यात आली होती.
कार्यकर्ते आणि नागरिकांच्या भावनेचा आदर करत तत्कालीन प्रशासक तथा मुख्याधिकारी मंजुषा गुरमे यांनी चौकाला ‘क्रांतीसूर्य महात्मा फुले चौक’ असे नाव देण्याचा ठराव मंजूर केला. त्यामुळे महात्मा फुले यांच्या विचारांना शहराच्या मध्यवर्ती भागात अधिकृत स्थान मिळाले.
शिल्प उभारणीसाठी आमदारांकडून १० लाखांचा निधी
चौकाचे नामकरण झाल्यानंतर लोकनियुक्त पदाधिकारी निवडून आल्यावर कृती समितीने चौकात महात्मा फुले यांचे शिल्प उभारण्याची मागणी केली. नगराध्यक्ष सुनंदा कापसे, सर्व नगरसेवक तसेच विरोधी पक्षनेते संजय मुंदडा यांच्याकडेही याबाबत पाठपुरावा करण्यात आला.
शिल्प उभारणीसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची मागणी घेऊन कृती समितीच्या शिष्टमंडळाने आमदार कैलास पाटील यांची भेट घेतली. यावेळी आमदार पाटील यांनी मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत कोणताही विलंब न करता १० लाख रुपयांचा निधी मंजूर केला. त्याबाबतचे पत्रही त्यांनी समितीला दिले.
विविध निवडणुकांच्या आचारसंहितेमुळे प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यास काहीसा विलंब झाला. मात्र सर्व आचारसंहिता संपल्यानंतर ऑगस्ट महिन्यात शिल्प उभारणीच्या कामाला सुरुवात करण्यात आली. काम पूर्ण झाल्यानंतर स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत १५ ऑगस्ट रोजी शिल्पाचे अनावरण करण्यात आले.
मान्यवरांची उपस्थिती
अनावरण कार्यक्रमाला नगराध्यक्ष सुनंदा कापसे, उपनगराध्यक्ष लखन गायकवाड, विरोधी पक्षनेते संजय मुंदडा, सामाजिक कार्यकर्ते तथा पर्याय सामाजिक संस्थेचे संस्थापक विश्वनाथ अण्णा तोडकर, जिल्हा परिषद धाराशिवचे समाजकल्याण सभापती विश्वासजी कोकणे, महिला व बालकल्याण समिती सभापती पूजा तुषार शिंदे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन महात्मा फुले चौक कृती समितीच्या वतीने करण्यात आले होते. समितीचे अध्यक्ष टी. जी. माळी, उपाध्यक्ष प्रा. राजेंद्र खडबडे, सचिव संतोष भोजने, सहसचिव अरुण माळी, कोषाध्यक्ष डॉ. राजेंद्र गोरे यांच्यासह समितीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बिभीषण यादव, अशोक खडबडे, हरी कुंभार, प्रा. संजय कांबळे, संतोष भांडे, प्रेम गोरे, सतपाल बनसोडे, दीपक माळी, रवी गोरे, धिरज दुधाळ, मनोज माळी, बाळासाहेब माळी, पोपट माळी, राहुल हौसलमल, किसन यादव, प्रताप यादव, महादेव माळी, पृथ्वीराज चिलवंत, राजाभाऊ गायकवाड, अनिल हजारे, सौदागर गोरे, सतपाल बचूटे, ह. भ. प. महादेव महाराज अडसूळ, भडंगे काका, सचिन क्षीरसागर यांच्यासह मोठ्या संख्येने फुलेप्रेमी नागरिक सहभागी झाले.
फुले विचारांना अभिवादन
महात्मा ज्योतिराव फुले यांनी शिक्षण, सामाजिक समता, स्त्री शिक्षण आणि अन्यायाविरुद्धच्या लढ्यात केलेले कार्य आजही समाजासाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या विचारांची आठवण करून देणारे हे शिल्प कळंब शहरातील नागरिकांसाठी प्रेरणास्थान ठरणार असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
तहसील कार्यालयासमोरील चौकाचे नामकरण, त्यानंतर चौकाचे सुशोभीकरण आणि आता महात्मा फुले यांच्या शिल्पाची उभारणी, या संपूर्ण प्रक्रियेत महात्मा फुले चौक कृती समिती, नगरपालिका प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि सामाजिक कार्यकर्त्यांचा सहभाग राहिला. त्यामुळे या चौकाला केवळ शहरातील एक महत्त्वाचा चौक म्हणून नव्हे, तर महात्मा फुले यांच्या सामाजिक परिवर्तनाच्या विचारांची आठवण करून देणारे ठिकाण म्हणूनही ओळख मिळणार आहे.
स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी झालेल्या या अनावरण सोहळ्यामुळे कळंब शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, महात्मा फुले यांच्या विचारांना अभिवादन करणाऱ्या या शिल्पामुळे शहराच्या सौंदर्यात आणि सामाजिक ओळखीत आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
