भूम | प्रतिनिधी :
भूम शहरातील गेल्या काही महिन्यांपासून रखडलेला घनकचरा व्यवस्थापनाचा प्रश्न अखेर मार्गी लागला असून, शहरातील स्वच्छता व्यवस्था पूर्ववत करण्याच्या दिशेने नगर परिषदेने पाऊल टाकले आहे. रविवारी (दि. १६ ऑगस्ट) नगराध्यक्षा संयोगिता गाढवे यांच्या हस्ते शहरातील स्वच्छता मोहिमेला पुन्हा सुरुवात करण्यात आली. त्यामुळे शहरातील विविध भागांत साचलेला कचरा हटवून स्वच्छता व्यवस्था सुरळीत होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
भूम नगर परिषद ही स्वच्छतेच्या क्षेत्रात राज्यात नावाजलेली नगरपालिका म्हणून ओळखली जाते. शहरातील स्वच्छता आणि घनकचरा व्यवस्थापनाच्या प्रभावी अंमलबजावणीबद्दल नगर परिषदेला शासनाकडून विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. मात्र, मागील काही महिन्यांपासून घनकचरा व्यवस्थापनाची निविदा प्रक्रिया रखडल्याने शहरातील स्वच्छता यंत्रणेवर त्याचा थेट परिणाम झाला होता.
निवडणुकीनंतर घनकचरा व्यवस्थापनाच्या निविदेला विरोधी गटातील काही नगरसेवकांनी विरोध केल्याने निविदेचा विषय अनेक महिने प्रलंबित राहिला. परिणामी कचरा संकलन आणि व्यवस्थापनाची यंत्रणा विस्कळीत झाली. शहरातील अनेक भागांत कचऱ्याचे ढीग साचल्याने नागरिकांना दुर्गंधी आणि अस्वच्छतेचा सामना करावा लागत होता. त्यामुळे शहराच्या स्वच्छतेचा प्रश्न गंभीर बनला होता आणि नागरिकांमधूनही नाराजी व्यक्त केली जात होती.
दरम्यान, घनकचरा व्यवस्थापनाच्या विषयावर नगर परिषदेत झालेल्या बैठकीत या प्रश्नावर सकारात्मक चर्चा झाली. निविदेला विरोध करणाऱ्या नगरसेवकांनीही मंजुरी देण्यास सहमती दर्शविल्याने अखेर घनकचरा व्यवस्थापनाचा रखडलेला मार्ग मोकळा झाला. त्यानंतर रविवारी शहरात पुन्हा स्वच्छता मोहीम सुरू करण्यात आली.
‘यापुढे स्वच्छतेच्या कामात अडथळा सहन केला जाणार नाही’ — नगराध्यक्षा गाढवे
स्वच्छता मोहिमेच्या प्रारंभी बोलताना नगराध्यक्षा संयोगिता गाढवे म्हणाल्या की, घनकचरा व्यवस्थापनाच्या निविदेला सुरुवातीपासूनच विरोध झाल्यामुळे शहरातील स्वच्छतेचे काम विस्कळीत झाले होते. मात्र, आता या विषयावर सर्वांनी सकारात्मक भूमिका घेतली असून, बैठकीत निविदेला मंजुरी देण्यास सहमती झाली आहे.
“भूम शहर पुन्हा स्वच्छ आणि कचरामुक्त करण्याचे उद्दिष्ट नगरपालिकेने ठेवले आहे. स्वच्छतेच्या कामात यापुढे कोणताही अडथळा सहन केला जाणार नाही. शहरातील नागरिकांना स्वच्छ आणि आरोग्यदायी वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी नगरपालिका प्रभावीपणे काम करेल,” असे नगराध्यक्षा गाढवे यांनी सांगितले.
स्वच्छता मोहिमेदरम्यान नगराध्यक्षा संयोगिता गाढवे, नगर अभियंता गणेश जगदाळे, गटनेते सुरज गाढवे, नगरसेविका रीमा शिंदे, अभिजीत शेटे, अख्तर सय्यद, महादेव मांजरे, उद्योजक बाळासाहेब सुर्वे यांच्यासह नगर परिषद कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.
घनकचरा व्यवस्थापनाची प्रक्रिया सुरळीत झाल्यानंतर शहरातील कचरा नियमितपणे संकलित करून त्याची योग्य विल्हेवाट लावण्यावर भर दिला जाणार आहे. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून निर्माण झालेली अस्वच्छतेची परिस्थिती दूर होऊन भूम शहर पुन्हा स्वच्छ व कचरामुक्त करण्याचे आव्हान नगर परिषदेसमोर आहे.
