शिवस्मारकासाठी बालशिवभक्त मित्रमंडळाच्या चिमुकल्यांकडून ५ हजार १ रुपयांची देणगी

लहान वयातच शिवभक्तीचा आदर्श; स्मारक उभारणीसाठी चिमुकल्यांचा उत्स्फूर्त सहभाग

यशश्री अपडेट्स | परंडा

छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मृती जपण्यासाठी आणि परंडा शहरात उभारण्यात येत असलेल्या शिवस्मारकाच्या कार्याला समाजातील विविध घटकांकडून मदतीचा हात दिला जात आहे. याच उपक्रमात परंडा शहरातील स्वामी समर्थ नगर येथील बालशिवभक्त मित्रमंडळाच्या चिमुकल्यांनी पुढाकार घेत ५ हजार १ रुपयांची देणगी शिवस्मारक समितीकडे सुपूर्द केली.

लहान वयातच छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांशी आणि कार्याशी जोडले जाण्याबरोबरच सामाजिक उपक्रमात योगदान देण्याची भावना या चिमुकल्यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिली आहे. शिवस्मारक उभारणीसाठी आपल्या परीने आर्थिक योगदान देत त्यांनी इतरांसमोर एक प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे.

बालशिवभक्त मित्रमंडळ, स्वामी समर्थ नगर, परंडा यांच्या वतीने अन्वीत प्रशांत सुरवसे, आराध्या सचिन भांडवलकर, आगस्था वैभव गायकवाड, आदित्यराज सचिन भांडवलकर, कौवल्य ज्ञानेश्वर सूर्यवंशी आणि इश्वरी परसराम धुमाळ या चिमुकल्यांनी एकत्रितपणे ₹५,००१ इतका निधी शिवस्मारक समितीकडे सुपूर्द केला.

छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना करताना दिलेला धैर्य, स्वाभिमान, सामाजिक बांधिलकी आणि लोककल्याणाचा विचार आजच्या पिढीपर्यंत पोहोचविणे महत्त्वाचे आहे. या पार्श्वभूमीवर चिमुकल्यांनी केलेले हे योगदान केवळ आर्थिक मदत नसून महाराजांच्या विचारांप्रती असलेली श्रद्धा आणि आदर व्यक्त करणारे आहे.

विशेष म्हणजे, मोठ्या व्यक्तींकडून होणाऱ्या देणग्यांसोबतच लहान मुलांनीही आपल्या परीने स्मारकाच्या कार्यात सहभाग नोंदविल्याने या उपक्रमाला भावनिक आणि सामाजिक महत्त्व प्राप्त झाले आहे. चिमुकल्यांनी स्वखुशीने दिलेल्या या योगदानाचे परिसरातील नागरिकांकडून कौतुक होत असून, ‘लहान वय, मोठी शिवभक्ती’ अशी भावना व्यक्त केली जात आहे.

शिवस्मारकाच्या उभारणीसाठी समाजातील प्रत्येक घटकाने आपले योगदान द्यावे, या भावनेला या चिमुकल्यांच्या उपक्रमामुळे निश्चितच बळ मिळाले आहे. त्यांच्या या सामाजिक बांधिलकीचे आणि शिवभक्तीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!