धाराशिव पोलिसांची मोठी कारवाई; कळंबमध्ये तब्बल ५९ लाखांचा अवैध गुटखा जप्त


यशश्री अपडेट्स : कळंब | प्रतिनिधी


धाराशिव जिल्हा पोलिसांनी अवैध गुटखा व प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांविरोधात मोठी कारवाई करत कळंब तालुक्यातील डीकसळ येथे तब्बल ५९ लाख २३ हजार रुपयांचा अवैध गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांचा साठा जप्त केला आहे. या प्रकरणी संबंधित व्यक्तीविरुद्ध अन्न सुरक्षा व मानके कायद्यान्वये पुढील कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
पोलीस अधीक्षक रितु खोखर व अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक अमोल मोहिते यांच्या नेतृत्वाखाली कळंब पोलीस ठाणे हद्दीत अवैध धंद्यांविरोधात विशेष मोहीम राबविण्यात येत होती.
याच मोहिमेदरम्यान, गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी दोन पंचांच्या उपस्थितीत डीकसळ येथील प्रभाकर भैरुबा चौधरी यांच्या घरातील एका खोलीवर छापा टाकला. या छाप्यात महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला गुटखा व विविध तंबाखूजन्य पदार्थांचा मोठा साठा आढळून आला.
चौकशीदरम्यान प्रभाकर चौधरी यांनी सदर खोली मागील एक महिन्यापासून गणेश भिकाजी घेवारे यांना भाडेतत्त्वावर दिल्याचे सांगितले. पुढील तपासात जप्त करण्यात आलेला प्रतिबंधित साठा हा गणेश घेवारे यांचाच असल्याचे निष्पन्न झाले.
छाप्यामध्ये सम्राट पान मसाला, गोवा १००० गुटखा, तारा पान मसाला, सिग्नेचर पान मसाला, अॅक्शन-७, के.आर. १०००, रत्नछाप, माणिकचंद, शिमला गुटखा, झाफरानी जर्दा यांसह विविध कंपन्यांच्या गुटखा व सुगंधित तंबाखूच्या हजारो पुड्यांचा साठा जप्त करण्यात आला. जप्त करण्यात आलेला सर्व मुद्देमाल कळंब पोलीस ठाण्यात जमा करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.
या कारवाईत सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण सोमवंशी, सुरेश कासुळे, पोलीस उपनिरीक्षक रामचंद्र बहुरे, सिराज पठाण तसेच आरसीपी, क्यूआरटी पथकातील अधिकारी-कर्मचारी आणि कळंब पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी मोलाची भूमिका बजावली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *