यशश्री अपडेट्स | धाराशिव / कळंब
कळंब आणि परभणी येथे उघडकीस आलेल्या एमडी ड्रग्ज तस्करी प्रकरणात तपासाचा वेग वाढला असून, या प्रकरणात कळंबचे नगरसेवक मोसीन सलीम मिर्झा यांना परभणी पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाने त्यांना पोलिस कोठडी सुनावली असून, या प्रकरणात आतापर्यंत अनेक आरोपींना अटक करण्यात आली आहे. पोलिस तपासानुसार या प्रकरणाचे धागेदोरे धाराशिव, लातूर, बीड, परभणी आणि पुणे जिल्ह्यांपर्यंत पोहोचत असल्याची शक्यता तपासली जात आहे.
जामखेडमधील कला केंद्रातून अटक
पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, मिर्झा यांना परभणी पोलिसांनी सापळा रचून जामखेड येथील एका कला केंद्रातून ताब्यात घेतले. तपासात त्यांच्या कथित सहभागाबाबत विविध पुरावे पडताळले जात असून, कॉल डिटेल रेकॉर्ड (CDR), आर्थिक व्यवहार आणि इतर तांत्रिक पुराव्यांच्या आधारे चौकशी सुरू आहे. पोलिसांच्या मते, ड्रग्जचे सेवन, पुरवठा आणि तस्करी या संदर्भातील कथित संबंधांचाही तपास सुरू आहे.
कळंब नेटवर्कवर पोलिसांचे लक्ष
कळंबमध्ये एमडी ड्रग्ज विक्रीचे स्वतंत्र नेटवर्क कार्यरत असल्याचा संशय तपास यंत्रणेला आहे. या प्रकरणात आतापर्यंत चार आरोपी निष्पन्न झाले असून त्यापैकी तीघांना अटक करण्यात आली आहे. चौथ्या आरोपीसंदर्भात पुणे पोलिसांकडून रिमांडची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.
तपास यंत्रणा कळंब, बीड, केज, परभणी, लातूर आणि पुणे या भागांतील परस्पर संबंधांची चौकशी करत आहे. काही संशयित व्यक्ती आणि संभाव्य आर्थिक साखळ्यांचाही तपास सुरू असून, आणखी काही जण पोलिसांच्या रडारवर असल्याचे सांगितले जात आहे.
धाराशिव पोलिसांची मोठी कारवाई
धाराशिव जिल्हा पोलिस अधीक्षक रितु खोखर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विनोद इज्जपवार यांच्या पथकाने कळंब शहरात कारवाई करून निखिल युवराज जाधव आणि अरविंद दादाराव कांबळे या दोघांना अटक केली होती. त्यांच्या ताब्यातून ११.२१ ग्रॅम वजनाच्या एमडी ड्रग्जच्या २९ पुड्या जप्त करण्यात आल्या.
यानंतर लखन गायकवाड यालाही अटक करण्यात आली असून, पिंपरी-चिंचवड येथील आणखी एक आरोपी या प्रकरणात निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक शकील शेख करत आहेत.
परभणी पोलिसांनी उघडकीस आणले आंतरजिल्हा रॅकेट
परभणी पोलिसांनी पोलिस अधीक्षक पंकज कुमावत आणि अपर पोलिस अधीक्षक तानाजी चिखले यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करत आंतरजिल्हा ड्रग्ज टोळीचा पर्दाफाश केला. पोलिस निरीक्षक गजेंद्र सरोदे यांच्या नेतृत्वाखाली २७ जुलै रोजी अलीम शेख खाजा (पाथरी) आणि शाहरुख फिरोजखान पठाण (अंबाजोगाई) या दोघांना ७२ ग्रॅम एमडी ड्रग्ज आणि सुमारे १४.६३ लाख रुपयांच्या मुद्देमालासह रंगेहात अटक करण्यात आली होती.
या प्रकरणी मानवत पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३६५/२०२६ दाखल करण्यात आला. त्यानंतर तपासादरम्यान ७ ऑगस्ट रोजी आणखी सहा आरोपींना अटक करण्यात आली.
अटक करण्यात आलेल्यांमध्ये मोसीन सलीम मिर्झा (कळंब, धाराशिव), अकीब अक्रम मोमीन (बीड), बाबा मोमीन रफीक (लातूर), सय्यद समीर सय्यद शब्बीर (परळी वैजनाथ), शेख सलमान शेख इरफान (परळी वैजनाथ) आणि अयान नासेर पठाण (परळी वैजनाथ) यांचा समावेश आहे. या सर्वांना न्यायालयाने ८ ऑगस्ट रोजी चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.
राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
मोसीन मिर्झा हे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे नगरसेवक असल्याने या अटकेनंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. त्यांच्या अटकेनंतर संबंधित पक्षाकडून अधिकृत भूमिका किंवा कारवाईबाबत स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे या प्रकरणाच्या राजकीय परिणामांकडेही लक्ष लागले आहे.
पुढील तपास महत्त्वाचा
या प्रकरणात ड्रग्ज पुरवठा साखळी, आर्थिक व्यवहार, स्थानिक संपर्क आणि आंतरजिल्हा नेटवर्क यांचा तपास सुरू आहे. पोलिस उपनिरीक्षक अनिल खिल्लारे यांच्या नेतृत्वाखाली तपास सुरू असून, पुढील काही दिवसांत आणखी अटक किंवा महत्त्वाचे खुलासे होण्याची शक्यता तपास यंत्रणा व्यक्त करत आहे.
