यशश्री अपडेट्स | धाराशिव
कळंब येथील ड्रग्ज तस्करी प्रकरणात आरोपी ठरलेल्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे नगरसेवक मोसीन सलीम मिर्झा यांची पक्षातून निलंबन करून हकालपट्टी करण्यात आली आहे, अशी माहिती आमदार कैलास पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. ड्रग्जसारख्या समाजघातक प्रवृत्तीविरोधात पक्षाची भूमिका अत्यंत ठाम असून, या प्रकरणात कोणताही आरोपी असला तरी त्याच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे आणि संपूर्ण ड्रग्ज रॅकेट उध्वस्त केले पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले.
आमदार पाटील म्हणाले की, धाराशिव जिल्ह्यात ड्रग्जचे वाढते प्रमाण अत्यंत चिंताजनक आहे. त्यामुळे जिल्ह्यासाठी स्वतंत्र नार्कोटिक्स युनिट स्थापन करण्याची मागणी मुख्यमंत्री यांच्याकडे करणार असून, या प्रकरणाचा सखोल आणि निष्पक्ष तपास होणे गरजेचे आहे. “ड्रग्जसारख्या समाजविघातक प्रवृत्तीला कोणत्याही परिस्थितीत थारा दिला जाणार नाही,” असेही त्यांनी ठामपणे सांगितले.
परभणी पोलिसांची कारवाई
नगरसेवक मोसीन सलीम मिर्झा याला परभणी पोलिसांनी तपासाअंती अटक केली असून न्यायालयाने त्याला पोलिस कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी सापळा रचून जामखेड येथील एका कला केंद्रातून त्याला ताब्यात घेतले. तपासादरम्यान मिर्झाचा ड्रग्ज सेवनापासून तस्करीपर्यंत सहभाग असल्याची माहिती पोलिस सूत्रांकडून मिळत आहे.
या प्रकरणात मिर्झाचे लातूर आणि धाराशिव जिल्ह्यातील काही व्यक्तींशी संबंध आहेत का, याचाही तपास सुरू आहे. मोबाईल कॉल डिटेल रेकॉर्ड (CDR), आर्थिक व्यवहार आणि इतर तांत्रिक पुराव्यांच्या आधारे पोलिस तपास करत असून, या प्रकरणात लवकरच आणखी काही धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
कळंबमध्ये मोठे ड्रग्ज नेटवर्क?
सूत्रांच्या माहितीनुसार, कळंब शहरात मोठ्या प्रमाणावर एमडी ड्रग्जची विक्री होत असल्याची माहिती तपासात समोर येत आहे. तरुणांमध्ये व्यसनाधीनतेचे प्रमाण वाढत असून, हे रॅकेट बीड, केज, परभणी आणि पुणे परिसरापर्यंत पसरल्याचा संशय आहे. या साखळीला काही स्थानिक राजकीय घटकांचे पाठबळ असल्याचीही चर्चा सुरू असून, तपास यंत्रणा त्या दिशेनेही चौकशी करत आहे.
तुळजापूरप्रमाणेच कळंबमध्येही काही प्रभावशाली व्यक्ती या नेटवर्कशी संबंधित असल्याचा संशय व्यक्त केला जात असून, काही जण व्यसनाधीन तर काही जण विक्री साखळीत सक्रिय असल्याची माहिती तपास यंत्रणांना मिळत आहे.
धाराशिव पोलिसांची मोठी कारवाई
धाराशिव पोलिस अधीक्षक रितु खोखर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विनोद इज्जपवार यांच्या पथकाने कळंब शहरात मोठी कारवाई करत निखिल युवराज जाधव आणि अरविंद दादाराव कांबळे या दोघांना अटक केली होती. त्यांच्याकडून ११.२१ ग्रॅम वजनाच्या एमडी ड्रग्जच्या २९ पुड्या जप्त करण्यात आल्या.
त्यानंतर लखन गायकवाड या आरोपीलाही अटक करण्यात आली असून, तपासात पिंपरी-चिंचवड येथील आणखी एका आरोपीचा सहभाग निष्पन्न झाला आहे. या प्रकरणात आणखी काही जण पोलिसांच्या रडारवर असून, पोलिस निरीक्षक शकील शेख यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.
आंतरजिल्हा टोळीचा पर्दाफाश
परभणी पोलिसांनी पोलिस अधीक्षक पंकज कुमावत आणि अपर पोलिस अधीक्षक तानाजी चिखले यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली. पोलिस निरीक्षक गजेंद्र सरोदे यांच्या नेतृत्वाखाली ड्रग्ज तस्करी करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा पर्दाफाश करण्यात आला.
या कारवाईत सुरुवातीला २७ जुलै रोजी अलीम शेख खाजा (रा. पाथरी) आणि शाहरुख फिरोजखान पठाण (रा. अंबाजोगाई, बीड) यांना १४ लाख ६३ हजार रुपयांच्या ७२ ग्रॅम एमडी ड्रग्जसह रंगेहात अटक करण्यात आली.
यानंतर मानवत पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३६५/२०२६ दाखल करून तपास सुरू ठेवण्यात आला. ७ ऑगस्ट रोजी आणखी सहा आरोपींना अटक करण्यात आली, त्यामध्ये:
- मोसीन सलीम मिर्झा (कळंब, धाराशिव)
- अकीब अक्रम मोमीन (बीड)
- बाबा मोमीन रफीक (लातूर)
- सय्यद समीर सय्यद शब्बीर (परळी वैजनाथ)
- शेख सलमान शेख इरफान (परळी वैजनाथ)
- अयान नासेर पठाण (परळी वैजनाथ)
या सर्व आरोपींना ८ ऑगस्ट रोजी न्यायालयाने चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक दर्शन शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अनिल खिल्लारे करत आहेत.
राजकीय वर्तुळात खळबळ
नगरसेवकाच्या अटकेनंतर कळंबसह संपूर्ण धाराशिव जिल्ह्यात मोठी राजकीय खळबळ उडाली आहे. शिवसेना (उबाठा) पक्षाने तातडीने कारवाई करत मिर्झाची हकालपट्टी केल्याने या प्रकरणाला नवे राजकीय वळण मिळाले आहे. दरम्यान, ड्रग्ज रॅकेटची व्याप्ती, त्यामागील आर्थिक व्यवहार, राजकीय संबंध आणि आंतरजिल्हा नेटवर्क यांचा तपास वेगाने सुरू असून, आगामी काही दिवसांत या प्रकरणात आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
