धाराशिव जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करावा — डॉ. प्रतापसिंह पाटील

कळंब तालुक्यात पावसाअभावी पिके करपली; राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तहसीलदारांना निवेदन

यशश्री अपडेट्स | कळंब : कळंब तालुक्यासह धाराशिव जिल्ह्यात निर्माण झालेल्या गंभीर दुष्काळसदृश परिस्थितीची शासनाने तातडीने दखल घेऊन जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉ. प्रतापसिंह भैय्या पाटील यांनी केली आहे. या मागणीसाठी डॉ. पाटील यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शुक्रवारी, दि. ४ सप्टेंबर रोजी कळंब तहसीलदारांना निवेदन दिले.

कळंब तालुक्यात खरीप हंगामातील पेरण्या पूर्ण झाल्यानंतर जवळपास दोन महिन्यांपासून पावसाने मोठी दडी मारल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. पावसाअभावी तालुक्यातील अनेक भागांतील पिके करपू लागली असून, शेतकऱ्यांसमोर मोठे आर्थिक संकट उभे ठाकले आहे.

विशेषतः सोयाबीनसह इतर खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सुरुवातीला पेरणीसाठी मोठा खर्च करून शेतकऱ्यांनी खरीप हंगामाची तयारी केली. मात्र, पिकांच्या वाढीच्या महत्त्वपूर्ण टप्प्यावरच पावसाने पाठ फिरवल्याने शेतकऱ्यांच्या अपेक्षांवर पाणी फिरले आहे. अनेक ठिकाणी पिके सुकत असल्याने उत्पादनात मोठी घट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

संयुक्त पंचनामे करण्याची मागणी

निवेदनामध्ये कळंब तालुक्यातील दुष्काळसदृश परिस्थितीचा तातडीने विचार करून तालुक्यातील सर्व महसूल मंडळांमधील पिकांचे संयुक्त पंचनामे करण्यात यावेत, अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे. नुकसानीचे वस्तुनिष्ठ मूल्यांकन करून त्याचा अहवाल शासनाकडे तातडीने पाठवावा आणि बाधित शेतकऱ्यांसाठी त्वरित आर्थिक मदत व अनुदान जाहीर करावे, अशी मागणीही करण्यात आली आहे.

शेतकऱ्यांना खरीप पीक विम्याचा लाभ आणि शासकीय नुकसानभरपाई विनाविलंब मिळावी, यासाठी प्रशासनाने आवश्यक ती कार्यवाही करावी, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

प्रलंबित पीक विम्याची रक्कम तातडीने देण्याची मागणी

शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांकडेही या निवेदनाद्वारे लक्ष वेधण्यात आले. सन २०२० मधील प्रलंबित पीक विम्याची रक्कम तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. त्याचबरोबर सन २०२३ ते २०२५ या कालावधीतील प्रलंबित पीक विम्याची रक्कमही त्वरित अदा करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली.

दुष्काळी परिस्थितीमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना वीजबिलामध्ये दिलासा देण्यात यावा, अशीही मागणी करण्यात आली आहे.

विद्यार्थ्यांना शुल्कमाफी व जनावरांसाठी चारा छावण्या सुरू करण्याची मागणी

दुष्काळाचा परिणाम केवळ शेतीवरच नव्हे, तर ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनावर होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. आर्थिक संकटामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होऊ नये, यासाठी विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्कामध्ये माफी किंवा सवलत देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

तसेच पावसाअभावी चाऱ्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता असल्याने जनावरांसाठी तातडीने चारा छावण्या सुरू करण्यात याव्यात, अशीही मागणी करण्यात आली आहे.

मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

प्रशासनाने धाराशिव जिल्ह्यातील आणि विशेषतः कळंब तालुक्यातील गंभीर परिस्थितीची तातडीने दखल घेऊन शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी युद्धपातळीवर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी केली आहे.

शेतकऱ्यांच्या न्याय्य मागण्यांकडे दुर्लक्ष करण्यात आल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.

मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉ. प्रतापसिंह भैय्या पाटील, कळंब तालुकाध्यक्ष प्रा. तुषार वाघमारे, शहराध्यक्ष बाळासाहेब कथले, जिल्हा उपाध्यक्ष सुरेश निवृत्तिराव टकाळे, सरचिटणीस आत्माराम बिक्कड, चिटणीस भरत शिंदे, सचिव रमेश देशमुख, किसान सेलचे जिल्हाध्यक्ष औदुंबर धोंगडे, युवक तालुकाध्यक्ष भीमा हगारे, तालुका सचिव वाहेद पटेल, माणिकराव जाधव, पुरुषोत्तम शिंदे, लक्ष्मण शिंदे, किरण जाधव, माजी सैनिक सेलचे अच्युतराव घोंगडे, आनंदा जगताप, महादेव अंबिरकर, लिंबाजी कांबळे, राजेश पाटील, अल्पसंख्याक सेलचे जिल्हा उपाध्यक्ष पटेल जिक्राईल, सोशल मीडिया जिल्हा उपाध्यक्ष चेतन वाघमारे, शंकर कदम, सामाजिक न्याय विभागाचे बालाजी वाघमारे, युवक जिल्हा उपाध्यक्ष विठ्ठल कोकाटे, तसेच शंभूराजे महाजन, नारायण तौर, राजाभाऊ भोसले, हनुमंत (बबलू) वाघमारे, निवृत्ती कोकाटे, गणेश वावरे, अमरदीप (बबलू) पाटील, अशोक (सोनू) मोरे, नागनाथ वाघमारे, राहुल माळी, करण यादव, चेतन नेमाणे, किरण पानढवळे, रणजित महाजन, विजयकुमार ठोंबरे, किरण खडबडे, शिवराज पोळ, बसवेश्वर महादेव भागुडे, समाधान वाघमारे आणि संकेत घोलप यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

error: Content is protected !!