शिराढोणमध्ये भाजपला धक्का; कार्यकर्त्यांचा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात जाहीर प्रवेश

यशश्री अपडेट्स | शिराढोण (ता. कळंब)

कळंब तालुक्यातील शिराढोण येथे भाजपला राजकीय धक्का बसल्याचे चित्र पाहायला मिळाले. येथील भाजपशी संबंधित अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात जाहीर प्रवेश करत हातात भगवा ध्वज घेतला. या पक्षप्रवेशामुळे शिराढोण आणि परिसरातील स्थानिक राजकारणात नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार कैलास पाटील यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. पक्षात प्रवेश करणाऱ्यांमध्ये उमाकांत साठे, दीपक सहाणे, संजय थोरात, बापू सहाणे, सुनील रसाळ, सोनू साठे, धनू नरसिंगे, दादा साठे, सोमनाथ सहाणे, लखन सहाणे, अमोल नरसिंगे, गोरख कांबळे, पप्पू साठे, अनिल रसाळ, राजेंद्र सहाणे, नितीन सहाणे, सूरज सहाणे आणि आकाश सहाणे यांचा समावेश आहे.

यावेळी आमदार कैलास पाटील यांनी सर्व नव्या सहकाऱ्यांचे शिवसेना परिवारात स्वागत केले. त्यांनी पक्षप्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांना सामाजिक आणि राजकीय वाटचालीस शुभेच्छा देत शिवसेनेची जनतेच्या प्रश्नांशी बांधिलकी अधोरेखित केली.

आ. पाटील म्हणाले की, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष हा सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी संघर्ष करणारा पक्ष आहे. अन्यायाविरोधात आवाज उठवणे आणि जनतेच्या हक्कांसाठी सातत्याने लढणे ही पक्षाची भूमिका असून नव्याने पक्षात दाखल झालेल्या कार्यकर्त्यांमुळे संघटनात्मक ताकद आणखी वाढेल. ग्रामीण भागातील प्रश्न सोडविण्यासाठी आणि पक्षाची विचारधारा अधिक व्यापक पातळीवर पोहोचविण्यासाठी या कार्यकर्त्यांचे योगदान महत्त्वाचे ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

या पक्षप्रवेश सोहळ्याला राजेश्वर पाटील, नासेर पठाण, संदीप पालकर, अवधूत पाटील, अशोक यादव, राजाभाऊ गायकवाड यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शिराढोणमधील या घडामोडीमुळे कळंब तालुक्यातील राजकीय समीकरणांवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या पक्षप्रवेशाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!