आयटीआय विद्यार्थ्यांना भविष्यात मोठ्या संधी; कौशल्यासह उच्च शिक्षण घेण्याचे आवाहन

यशश्री अपडेट्स | कळंब

येणाऱ्या काळात तंत्रशिक्षणाला मोठे महत्त्व प्राप्त झाले असून आयटीआयमधून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होत आहेत. विद्यार्थ्यांनी आवश्यक कौशल्ये आत्मसात केल्यास त्यांना राष्ट्रीय तसेच जागतिक स्तरावर मोठी मागणी राहील, असे प्रतिपादन उपजिल्हाधिकारी प्राजक्ता पाटील साळुंखे यांनी केले.

कळंब येथील वेद शैक्षणिक संकुलातील भैरवनाथ खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या आयटीआय विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभात त्या प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य सतीश मातने होते. यावेळी डॉ. सुशील शेळके, प्राचार्य सुरज भांडे तसेच प्रा. सुकेशनी गव्हाणे-मातने यांची प्रमुख उपस्थिती होती.

मार्गदर्शन करताना प्राजक्ता पाटील साळुंखे म्हणाल्या की, आयटीआयचे शिक्षण पूर्ण झाले म्हणजे शिक्षणाचा प्रवास संपत नाही. उद्योग, व्यवसाय किंवा नोकरी करत असतानाच विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षणाच्या संधींचा लाभ घ्यावा. बहिस्त शिक्षणाच्या माध्यमातून पुढील शिक्षण घेऊन स्पर्धा परीक्षांची तयारी करावी. प्रशासकीय सेवांमध्ये जाण्याची इच्छा असलेल्या विद्यार्थ्यांनी त्या दिशेने प्रयत्न करावेत. एमपीएससी परीक्षेच्या तयारीदरम्यानचे स्वतःचे अनुभवही त्यांनी विद्यार्थ्यांसमोर मांडले.

यावेळी डॉ. सुशील शेळके यांनी विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करण्याचे आवाहन केले. कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि ChatGPT सारख्या तंत्रज्ञानाच्या मदतीने विविध कौशल्ये विकसित करता येतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी नवीन तंत्रज्ञानाची माहिती घेऊन स्वतःचा सर्वांगीण विकास साधावा, असे त्यांनी सांगितले.

अध्यक्षीय समारोपात प्राचार्य सतीश मातने यांनी भैरवनाथ औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांच्या कौशल्यांचा गौरव करताना सांगितले की, येथून बाहेर पडणारे विद्यार्थी उद्योग क्षेत्राच्या गरजा पूर्ण करण्यास सक्षम आहेत. त्यामुळे त्यांना मोठ्या कंपन्यांमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत. प्रगतीसाठी आवश्यक असल्यास विद्यार्थ्यांनी गावाबाहेर जाऊन काम करण्याची तयारी ठेवावी, असेही त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य सुरज भांडे यांनी केले. सूत्रसंचालन अविनाश म्हेत्रे यांनी तर आभार प्रदर्शन गिरीधर कवडे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राजकुमार शिंदे, सुप्रिया चव्हाण, दीक्षा गायकवाड आणि विनोद कसबे यांनी विशेष परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *