तस्करी, पुरवठा, विक्री आणि सेवन करणारे पोलिसांच्या रडारवर; कळंबमधील म्होरक्या कोण, तपासासमोर मोठे आव्हान
यशश्री अपडेट्स | कळंब
कळंब शहरातील ड्रग्ज रॅकेटचा तपास दिवसेंदिवस अधिक व्यापक होत असून या प्रकरणाचे धागेदोरे आता थेट पुणे आणि बीडपर्यंत पोहोचल्याचे तपासातून समोर आले आहे. या प्रकरणात आणखी दोन नवीन आरोपी निष्पन्न झाले असून त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची स्वतंत्र पथके पुणे आणि बीड येथे रवाना करण्यात आली आहेत. ड्रग्ज तस्करीच्या साखळीत पुरवठादार, विक्रेते आणि सेवन करणारे या तिन्ही स्तरांवरील व्यक्ती पोलिसांच्या रडारवर असून संपूर्ण नेटवर्क उद्ध्वस्त करण्याच्या दृष्टीने तपास सुरू आहे.
या प्रकरणातील अटक आरोपी निखिल युवराज जाधव आणि अरविंद दादाराव कांबळे यांची पोलीस कोठडी शुक्रवारी संपल्यानंतर त्यांना कळंब न्यायालयात हजर करण्यात आले. तपासासाठी आणखी वेळ आवश्यक असल्याचे पोलिसांनी न्यायालयात सांगितल्यानंतर न्यायालयाने दोन्ही आरोपींना सोमवारपर्यंत वाढीव पोलीस कोठडी सुनावली.
११.२१ ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पोलिस निरीक्षक विनोद इज्जपवार यांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या कारवाईत आरोपींकडून ११.२१ ग्रॅम वजनाच्या एमडी (मेफेड्रोन) ड्रग्जच्या २९ पुड्या जप्त करण्यात आल्या होत्या. या कारवाईनंतर कळंब शहरात सक्रिय असलेल्या ड्रग्ज रॅकेटचा मोठा पर्दाफाश झाला.
या प्रकरणाचा तपास पोलिस अधीक्षक रितु खोखर यांच्या मार्गदर्शनाखाली कळंब पोलिस निरीक्षक शकील शेख करीत आहेत. न्यायालयीन कामकाजात जिल्हा सरकारी वकील अॅड. महेंद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सरकारी वकील अॅड. आशीष कुलकर्णी यांनी पोलिसांची बाजू प्रभावीपणे मांडली.
कळंबमधील ‘म्होरक्या’चा शोध
या रॅकेटचा मुख्य सूत्रधार किंवा म्होरक्या कोण? हा तपासातील सर्वात महत्त्वाचा मुद्दा ठरला आहे. जप्त करण्यात आलेले ड्रग्ज नेमके कोणाकडून आणले गेले, कोणाला पुरविले गेले, कोणत्या माध्यमातून विक्री केली जात होती आणि त्याचे सेवन करणारे कोण आहेत, याचा तपास पोलीस सखोलपणे करीत आहेत.
कळंब शहरात गेल्या अनेक वर्षांपासून ड्रग्जचा पुरवठा आणि सेवन सुरू असल्याच्या चर्चा होत होत्या. मात्र, स्थानिक गुन्हे शाखेने केलेल्या कारवाईनंतर या चर्चांना प्रत्यक्ष आधार मिळाला आहे. पोलिसांसमोर आता केवळ आरोपींना अटक करणे नव्हे, तर ड्रग्जच्या संपूर्ण साखळीची पाळेमुळे शोधून ती उध्वस्त करणे हे मोठे आव्हान आहे.
पुणे आणि बीड कनेक्शनची चौकशी
तपासादरम्यान आरोपींच्या संपर्कातील काही व्यक्तींचे धागेदोरे पुणे आणि बीड जिल्ह्यात आढळून आले आहेत. त्यामुळे या दोन्ही जिल्ह्यांतील संभाव्य पुरवठादार, आर्थिक व्यवहार, मोबाईल कॉल रेकॉर्ड, डिजिटल व्यवहार आणि इतर संपर्कांची चौकशी सुरू करण्यात आली आहे. पोलिसांना या प्रकरणात आणखी काही आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता आहे.
यापूर्वी तुळजापूर रॅकेट उध्वस्त
स्थानिक गुन्हे शाखेने यापूर्वी तामलवाडी येथे कारवाई करून तुळजापूर परिसरातील ड्रग्ज रॅकेट उध्वस्त केले होते. त्यानंतर आता कळंबमधील कारवाईमुळे जिल्ह्यातील ड्रग्ज नेटवर्कवर पोलिसांनी मोठा प्रहार केला आहे.
या प्रकरणी पोलीस ठाणे कळंब येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक ३२६/२०२६ अन्वये एनडीपीएस कायदा कलम ८(क) आणि २२(ब) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तपास पथकाची कामगिरी
या कारवाईत अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार (स्थानिक गुन्हे शाखा, धाराशिव), सपोनि खटके, सपोनि मगर (कळंब), पोहेकॉ राठोड, जानराव, गादेकर, जाधवर, चौरे, पोना जाधवर, पोना ढगारे, पोअं मुंगळे, पोहेकॉ शेख, माळवे, बोईनवाड, आरब आणि चापोहेकॉ माने यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली.
कळंब शहरातील ड्रग्ज रॅकेटचा तपास आता निर्णायक टप्प्यात पोहोचला असून या प्रकरणातील मुख्य सूत्रधार आणि संपूर्ण नेटवर्क उघड करण्याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
