अक्षय बर्वे यांच्या पुढाकारातून सामाजिक उपक्रम; ‘खेळात रंगली पैठणी’ कार्यक्रमालाही उत्स्फूर्त प्रतिसाद
यशश्री अपडेट्स | भूम :
भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तथा माजी मंत्री मा. श्री. रविंद्रजी चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त युवा नेतृत्व श्री. अक्षय (अक्की) बर्वे यांच्या वतीने भूम येथे विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये गरजू विद्यार्थी-विद्यार्थिनींना मोफत सायकलींचे वाटप तसेच महिलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या ‘खेळात रंगली पैठणी’ या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून मा.आ. सुजितसिंह ठाकूर उपस्थित होते.मान्यवरांच्या हस्ते ५६ गरजू विद्यार्थी-विद्यार्थिनींना मोफत सायकलींचे वाटप करण्यात आले. ग्रामीण व आर्थिकदृष्ट्या गरजू विद्यार्थ्यांना शाळा-महाविद्यालयात जाण्यासाठी होणारी गैरसोय लक्षात घेऊन राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले.
यावेळी जय हनुमान ग्रुप व मल्हार आर्मीचे संस्थापक सुरेशभाऊ कांबळे, माजी जिल्हा परिषद सदस्य आर. डी. सुळ, भाजपा भूम तालुका अध्यक्ष संतोष सुपेकर, नगरसेवक आबासाहेब मस्कर, भाजपा अनुसूचित जाती मोर्चा धाराशिव जिल्हा सरचिटणीस प्रदीप साठे, सोमनाथ देवकर, कृष्णा चैतन्य, तरंगे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. तसेच विद्यार्थी-विद्यार्थिनी आणि महिला भगिनी मोठ्या संख्येने कार्यक्रमास उपस्थित राहिल्या.
विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन

विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात टिकवून ठेवण्यासाठी तसेच त्यांच्या दैनंदिन प्रवासातील अडचणी कमी करण्यासाठी सायकल वाटपाचा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरत असल्याचे यावेळी उपस्थित मान्यवरांनी सांगितले. गरजू विद्यार्थ्यांची निवड करून त्यांना सायकली उपलब्ध करून देण्यात आल्याने विद्यार्थ्यांमध्येही उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
सायकल मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त करत आयोजकांचे आभार मानले. सामाजिक बांधिलकी जपत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाटचालीला हातभार लावणारे उपक्रम भविष्यातही राबविण्याची अपेक्षा उपस्थितांनी व्यक्त केली.
‘खेळात रंगली पैठणी’ला महिलांचा उत्स्फूर्त सहभाग
कार्यक्रमाच्या निमित्ताने महिलांसाठी ‘खेळात रंगली पैठणी’ या मनोरंजनात्मक कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले. विविध खेळ व मनोरंजनाच्या माध्यमातून महिलांनी कार्यक्रमाचा आनंद लुटला. या उपक्रमाला महिला भगिनींचा मोठा प्रतिसाद मिळाला.
कार्यक्रमस्थळी उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. महिलांच्या सहभागामुळे कार्यक्रमाला सामाजिक उपक्रमासोबतच मनोरंजनाचीही जोड मिळाली.
कार्यकर्त्यांशी आत्मीय संबंध अधोरेखित

यावेळी बोलताना रविंद्रजी चव्हाण यांच्या राजकीय व संघटनात्मक प्रवासाचा उल्लेख करण्यात आला. कार्यकर्ता ते नगरसेवक, आमदार, मंत्री आणि भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष असा त्यांचा प्रवास राहिला असून, संघटन कौशल्य आणि कार्यकर्त्यांशी असलेली आत्मीयता यामुळे त्यांनी पक्ष संघटनेत वेगळी ओळख निर्माण केली असल्याचे मा. आ. सुजितसिंह ठाकुर यांनी नमूद केले.
कार्यकर्त्यांना बळ देत त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे नेतृत्व म्हणून रविंद्रजी चव्हाण यांच्याकडे पाहिले जाते. त्यांच्या वाढदिवसानिमित्त अक्षय (अक्की) बर्वे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सामाजिक जाणिवेतून राबविलेला सायकल वाटपाचा उपक्रम हा कार्यकर्त्यांमधील जिव्हाळ्याचे आणि सामाजिक बांधिलकीचे उदाहरण असल्याचे यावेळी मा.आ.सुजितसिंह ठाकुर यांनी आपल्या भाषणात सांगण्यात आले.
सामाजिक उपक्रमाबद्दल अक्षय बर्वे यांचे अभिनंदन

रविंद्रजी चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त केवळ शुभेच्छा न देता गरजू विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा लक्षात घेऊन सायकल वाटप आणि महिलांसाठी ‘खेळात रंगली पैठणी’सारखा उपक्रम आयोजित केल्याबद्दल अक्षय (अक्की) बर्वे व त्यांच्या सहकाऱ्यांचे मान्यवरांनी अभिनंदन केले.
याप्रसंगी रविंद्रजी चव्हाण यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यात आल्या. त्यांच्या नेतृत्वाखाली भाजपा संघटना अधिक मजबूत व्हावी, तसेच सामाजिक आणि संघटनात्मक कार्याला पुढील काळातही बळ मिळावे, अशा शुभेच्छा उपस्थितांनी व्यक्त केल्या.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अक्षय बर्वे यांच्या सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. विद्यार्थी, महिला आणि नागरिकांच्या मोठ्या उपस्थितीमुळे कार्यक्रम उत्साहात पार पडला.
