भूम पोलीस निरीक्षक गणेश कानगुडे यांची बदली करू नये; वंचित आघाडीचा 14 ऑगस्टपासून आमरण उपोषणाचा इशारा

यशश्री अपडेट्स | भूम

भूम शहरातील पोलीस निरीक्षक श्री. गणेश कानगुडे यांची प्रस्तावित बदली रद्द करण्यात यावी, या मागणीसाठी भूम शहर वंचित आघाडीने उपविभागीय अधिकारी, भूम यांना निवेदन सादर केले आहे. तसेच या मागणीची दखल न घेतल्यास 14 ऑगस्टपासून उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करण्यात येईल, असा इशाराही वंचित आघाडीने दिला आहे.

निवेदनात म्हटले आहे की, पोलीस निरीक्षक श्री. गणेश कानगुडे यांनी आपल्या कार्यकाळात भूम शहर आणि परिसरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रभावीपणे काम केले आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत त्यांनी जबाबदारीने कर्तव्य बजावले असून, त्यांच्या कार्यपद्धतीमुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये पोलीस प्रशासनाबद्दल विश्वास निर्माण झाला आहे.

वंचित आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी असा आरोप केला की, शहरातील काही मंडळी स्वतःच्या स्वार्थासाठी पोलीस निरीक्षक कानगुडे आणि पोलीस प्रशासनावर दबाव आणण्याचा प्रयत्न करीत आहेत. अशा दबावामुळे प्रामाणिकपणे काम करणाऱ्या अधिकाऱ्याची बदली होणे हे जनहिताच्या विरोधात असल्याचे त्यांनी नमूद केले.

श्री. कानगुडे यांनी नागरिकांच्या तक्रारींना तत्काळ प्रतिसाद देणे, गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवणे, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे आणि नागरिकांशी समन्वय साधणे या बाबींमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली असल्याचे निवेदनात म्हटले आहे. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत त्यांची अचानक बदली झाल्यास पोलीस प्रशासनाच्या कामकाजावर तसेच परिसरातील शांतता आणि सुव्यवस्थेवर विपरीत परिणाम होऊ शकतो, अशी भीती वंचित आघाडीने व्यक्त केली आहे.

नागरिकांच्या हिताचा आणि परिसरातील शांततेचा विचार करून पोलीस निरीक्षक गणेश कानगुडे यांना भूम पोलीस ठाण्यातच कार्यरत ठेवण्याचा निर्णय घ्यावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. या मागणीची दखल न घेतल्यास 14 ऑगस्टपासून उपविभागीय अधिकारी कार्यालय, भूम येथे आमरण उपोषण करण्यात येईल, असा ठाम इशारा वंचित आघाडीच्या वतीने देण्यात आला आहे.

यावेळी रोहित गायकवाड, विकी जावळे, ॲड. हृदयानंद सुकाळे यांच्यासह वंचित आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

error: Content is protected !!