शिक्षण, समाजसेवा आणि कृषी क्षेत्रातील योगदानाचा गौरव; बिभीषण रोडगे यांना राष्ट्रीय पुरस्कार जाहीर

यशश्री अपडेट्स-परंडा (प्रतिनिधी):
शिक्षण, सामाजिक कार्य आणि कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल घेत एकता सेवाभावी संस्था महाराष्ट्र यांच्या वतीने दिला जाणारा प्रतिष्ठेचा “शिक्षण व सामाजिक कार्य राष्ट्रीय पुरस्कार २०२६” हा पुरस्कार श्री शिवछत्रपती शिक्षण प्रसारक मंडळ, बावचीचे संस्थापक अध्यक्ष, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ तथा समाजसेवक बिभीषण रोडगे यांना जाहीर करण्यात आला आहे. त्यांच्या दीर्घकालीन शैक्षणिक, सामाजिक आणि कृषी क्षेत्रातील कार्याचा गौरव म्हणून हा सन्मान प्रदान करण्यात येत आहे.
या पुरस्काराची घोषणा एकता सेवाभावी संस्था महाराष्ट्राचे संस्थापक अध्यक्ष अजमत खान, निवड समितीचे अध्यक्ष सुरेश हिवराळे तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार विक्रम काळे यांनी केली. पुरस्कार वितरण सोहळा दि. ११ जून २०२६ रोजी दुपारी २.३० वाजता मुंबई येथील मराठी पत्रकार भवन, मनपा मार्ग, आझाद मैदान येथे जागतिक दृष्टीदान दिनाच्या औचित्याने संपन्न होणार आहे.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार व संस्कारमूल्यांवर आधारित शिक्षण मिळावे या ध्येयाने बिभीषण रोडगे यांनी सन २००२ मध्ये बावची येथे “बावची विद्यालय”ची स्थापना केली. सुरुवातीच्या काळात अल्प विद्यार्थीसंख्या, आर्थिक अडचणी आणि विविध अडथळ्यांवर मात करत त्यांनी शिक्षणाची ज्योत अखंड प्रज्वलित ठेवली. विद्यार्थ्यांच्या वाढत्या शैक्षणिक गरजा लक्षात घेऊन सन २०१३ मध्ये या शाळेचे स्थलांतर परंडा शहरात करण्यात आले.
अत्यंत कमी पटसंख्येपासून सुरू झालेल्या या शैक्षणिक संस्थेने गुणवत्तेच्या बळावर मोठी भरारी घेतली असून आज संस्थेतील विद्यार्थ्यांची संख्या अडीच हजारांच्या घरात पोहोचली आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षण, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, आधुनिक सुविधा, शिस्तबद्ध वातावरण आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे ही संस्था आज परंडा तालुक्यातील अग्रगण्य संस्थांपैकी एक म्हणून ओळखली जाते.
श्री शिवछत्रपती शिक्षण प्रसारक मंडळाच्या माध्यमातून सध्या बावची विद्यालय परंडा, राजे शिवाजी पब्लिक स्कूल परंडा आणि वसंतराव शंकरराव काळे कनिष्ठ महाविद्यालय परंडा या संस्था यशस्वीपणे चालविल्या जात आहेत. ग्रामीण भागातील शेतकरी व शेतमजूर कुटुंबांतील विद्यार्थ्यांनाही शहराच्या तोडीस तोड शिक्षण मिळावे या उद्देशाने त्यांनी परंडा येथे आधुनिक सुविधांनी सज्ज असे भव्य चार मजली शैक्षणिक संकुल उभारले आहे. उत्कृष्ट निकाल, दर्जेदार शिक्षण आणि शिस्त यामुळे या संस्थेने विशेष प्रतिष्ठा मिळविली आहे.
बिभीषण रोडगे यांनी केवळ शिक्षण क्षेत्रातच नव्हे तर सामाजिक क्षेत्रातही मोलाचे योगदान दिले आहे. ते महाराष्ट्र राज्य विनाअनुदानित शाळा कृती समितीचे लातूर विभागीय अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. विनाअनुदानित शाळांना १०० टक्के अनुदान मिळावे यासाठी त्यांनी सन २००४ पासून सातत्याने संघर्ष केला आहे. विविध आंदोलने, मोर्चे, बैठका आणि शासनस्तरावरील पाठपुराव्याद्वारे त्यांनी शिक्षक, संस्था चालक आणि विद्यार्थ्यांचे प्रश्न प्रभावीपणे मांडले असून त्यांच्या न्याय हक्कासाठी सातत्याने लढा दिला आहे.
स्वतः सेवानिवृत्त मुख्याध्यापक असलेल्या बिभीषण रोडगे यांनी श्री संत ज्ञानेश्वर प्रशाला, लोणी (ता. परंडा) येथे सहशिक्षक ते मुख्याध्यापक असा प्रदीर्घ प्रवास केला आहे. मुख्याध्यापक म्हणून कार्यरत असताना त्यांनी शाळेची शैक्षणिक गुणवत्ता वाढविणे, सुसज्ज इमारत उभारणे, शिक्षकांमध्ये समन्वय निर्माण करणे आणि विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी विशेष प्रयत्न केले. त्यांच्या नेतृत्वाखाली शाळेने शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती साधली.
शिक्षण आणि सामाजिक कार्यासोबतच कृषी क्षेत्रातही त्यांचे योगदान तितकेच उल्लेखनीय आहे. शेतीविषयी असलेल्या विशेष जिव्हाळ्यामुळे त्यांनी सेवानिवृत्तीनंतर पूर्णवेळ शेतीकडे लक्ष केंद्रित केले. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, नियोजनबद्ध व्यवस्थापन आणि कष्टाच्या बळावर त्यांनी आदर्श शेती उभी केली आहे. त्यांच्या शेतातील प्रयोगशीलता आणि उत्पादनक्षमता परिसरातील अनेक शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
याचबरोबर आमदार तथा माजी आरोग्यमंत्री डॉ. तानाजीराव सावंत आणि आमदार विक्रम काळे यांचे विश्वासू सहकारी म्हणूनही त्यांनी स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. सामाजिक, शैक्षणिक आणि जनसंपर्काच्या माध्यमातून त्यांनी सामान्य नागरिकांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी सक्रिय भूमिका बजावली आहे. त्यांच्या संघटन कौशल्यामुळे आणि समाजाभिमुख कार्यामुळे त्यांना राजकीय व सामाजिक क्षेत्रातही विशेष मानाचे स्थान प्राप्त झाले आहे.
पुरस्कार जाहीर झाल्यानंतर भावना व्यक्त करताना बिभीषण रोडगे म्हणाले, “हा सन्मान केवळ माझा नसून संस्थेतील सर्व शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी, पालक, सहकारी आणि समाजातील सर्व घटकांच्या सामूहिक प्रयत्नांचा गौरव आहे. या पुरस्कारामुळे शिक्षण, सामाजिक कार्य आणि कृषी क्षेत्रात अधिक जोमाने कार्य करण्याची प्रेरणा मिळाली आहे.” तसेच पुरस्कारासाठी निवड करणाऱ्या सर्व मान्यवरांचे त्यांनी मनःपूर्वक आभार मानले.
दरम्यान, बिभीषण रोडगे यांना राष्ट्रीय स्तरावरील हा प्रतिष्ठेचा पुरस्कार जाहीर झाल्याने परंडा तालुक्यासह शिक्षण, सामाजिक आणि कृषी क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून सर्व स्तरांतून त्यांचे कौतुक केले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *