सामाजिक व शैक्षणिक कार्याची दखल; प्रा. डॉ. शहाजी चंदनशिवे यांना समाजभूषण पुरस्कार

यशश्री अपडेट्स | परंडा प्रतिनिधी

रा. गे. शिंदे महाविद्यालय, परांडा येथील प्राणीशास्त्र विभागाचे सहयोगी प्राध्यापक तसेच फुले-आंबेडकर विद्वत सभा महाराष्ट्र राज्याचे राज्य समन्वयक प्रा. डॉ. शहाजी चंदनशिवे यांना त्यांच्या शैक्षणिक, सामाजिक आणि वैचारिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल ‘राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार २०२५’ प्रदान करून सन्मानित करण्यात आले.

निळे प्रतीक बहुउद्देशीय सेवाभावी संस्था तथा दैनिक निळे प्रतीक यांच्या वतीने आयोजित १६ व्या वर्धापन दिनानिमित्त छत्रपती संभाजीनगर येथील मौलाना आझाद रिसर्च सेंटर येथे १ जून २०२५ रोजी झालेल्या भव्य पुरस्कार वितरण सोहळ्यात त्यांना हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

प्रा. डॉ. चंदनशिवे हे महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समतावादी विचारांचे अभ्यासक व प्रचारक म्हणून राज्यभर परिचित आहेत. व्याख्याने, परिसंवाद, लेखन आणि विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून त्यांनी समाजप्रबोधनाचे कार्य सातत्याने केले आहे. शिक्षण, समाजकारण आणि वैचारिक चळवळींमध्ये त्यांनी दिलेले योगदान विशेष उल्लेखनीय मानले जाते.

फुले-आंबेडकरी विचारांचा प्रसार त्यांनी केवळ भाषण व लेखनापुरता मर्यादित न ठेवता कृतीतूनही केला आहे. नव्या पिढीमध्ये सामाजिक जाणीव, समतेची मूल्ये आणि वैचारिक संस्कार रुजविण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले आहेत. त्यांच्या लेखन व वक्तृत्वातून सामाजिक बांधिलकी, वैचारिक स्पष्टता आणि परिवर्तनवादी दृष्टिकोन प्रकर्षाने दिसून येतो.

या सन्मानाबद्दल श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळ, धाराशिवचे सचिव संजय बप्पा निंबाळकर, अध्यक्ष सुनील नाना शिंदे, प्राचार्य सुनील जाधव, उपप्राचार्य डॉ. महेशकुमार माने, कनिष्ठ विभागाचे पर्यवेक्षक डॉ. किरण देशमुख, कार्यालयीन अधीक्षक पद्म शिंदे, प्रशासकीय अधिकारी भाऊसाहेब दिवाने यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच शैक्षणिक, सामाजिक आणि आंबेडकरी चळवळीतील मान्यवरांनी प्रा. डॉ. शहाजी चंदनशिवे यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *