तांबेवाडी तांड्यात वनविभागाची धडक कारवाई; ३५ टन अवैध लाकूडसाठा जप्त, १३ शेतकऱ्यांवर वनगुन्हे दाखल

यशश्री अपडेट्स-बार्शी (पप्रतिनिधी )
बार्शी तालुक्यातील मौजे तांबेवाडी तांडा येथे वनविभागाने मोठी धडक कारवाई करत सुमारे ३० ते ३५ टन अवैध लाकूडसाठा जप्त केला आहे. या कारवाईमुळे अवैध वृक्षतोड करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून, वनविभागाने १२ ते १३ शेतकऱ्यांविरोधात महाराष्ट्र वृक्षतोड (नियमन) अधिनियम १९६४ अंतर्गत वनगुन्हे दाखल केले आहेत.
वनविभागाला ३ जून २०२६ रोजी तांबेवाडी तांडा परिसरातील काही शेतकऱ्यांनी आपल्या मालकीच्या क्षेत्रात तसेच घराजवळील परिसरात विनापरवाना वृक्षतोड केल्याची गुप्त माहिती प्राप्त झाली होती. या माहितीची पडताळणी करून वनविभागाच्या पथकाने तात्काळ छापा टाकत कारवाई केली.
छाप्यामध्ये लिंब, आंबा, चिंच यांसारख्या विविध प्रजातींच्या वृक्षांची बेकायदेशीर तोड करून साठवून ठेवलेला सुमारे ३० ते ३५ टन लाकडाचा साठा आढळून आला. वनविभागाने तातडीने हा संपूर्ण लाकूडसाठा जप्त केला असून संबंधितांविरोधात कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास वनविभागाकडून वेगाने करण्यात येत आहे.
ही कारवाई सोलापूरचे उपवनसंरक्षक कुलराज सिंह आणि सहाय्यक वनसंरक्षक (रोहयो) अजित शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. बार्शीचे वनपरिक्षेत्र अधिकारी एस. एस. बडे यांनी मोहिमेचे नेतृत्व केले.
कारवाईमध्ये वनपाल डी. बी. शिदोडकर, ए. आर. पिरजादे, वनरक्षक बालाजी धुमाळ, सचिन पुरी, करामत अली शेख, सुलतान शेख, पूजा खेणे, वनमजूर आशा बी. अन्सारी तसेच वाहन चालक सिद्धेश्वर जाधव आणि शाबाज मुल्ला यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
दरम्यान, वनविभागाने नागरिकांना आवाहन करताना सांगितले की, अवैध वृक्षतोड, बेकायदेशीर लाकूड वाहतूक तसेच वन्यजीवांची शिकार करणे हा गंभीर वनगुन्हा आहे. अशा प्रकारच्या बेकायदेशीर कृत्यांपासून नागरिकांनी दूर राहावे. आपल्या परिसरात कोणताही संशयास्पद प्रकार आढळल्यास तात्काळ वनविभागाला माहिती द्यावी. वृक्षसंवर्धन आणि पर्यावरण संरक्षण ही सर्वांची सामूहिक जबाबदारी असून यासाठी नागरिकांनी वनविभागाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
तांबेवाडी तांडा येथील या कारवाईमुळे परिसरातील अवैध वृक्षतोडीच्या प्रकारांना आळा बसण्यास मदत होणार असून वनसंपत्तीच्या संरक्षणासाठी वनविभागाने कठोर भूमिका घेतल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *