वारदवाडी येथे भीषण हिट अँड रन; दोघांचा जागीच मृत्यू, थार चालक फरार

यशश्री अपडेट्स | परंडा| प्रतिनिधी
परंडा तालुक्यातील वारदवाडी फाट्याजवळ मंगळवारी (दि. ९ जून) सायंकाळी साडेसातच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून पोलिसांकडून फरार वाहनचालकाचा शोध सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भरधाव वेगाने येणाऱ्या काळ्या रंगाच्या थार वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की दुचाकीवरील दोघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघातानंतर थार चालकाने वाहन न थांबवता घटनास्थळावरून पलायन केले.
अपघातात मृत्यू झालेले दोघेही बार्शी तालुक्यातील खांडवी गावचे रहिवासी असून त्यांची नावे सर्जेराव पाटील आणि बाबा गव्हाणे अशी आहेत. त्यांच्या निधनामुळे खांडवी गावावर शोककळा पसरली आहे.
घटनास्थळी आढळलेल्या पुराव्यांनुसार, धडकेच्या तीव्रतेमुळे थार गाडीच्या पुढील भागावरील ‘THAR’ लोगो तुटून रस्त्यावर पडला होता. या महत्त्वाच्या धाग्याच्या आधारे पोलिसांनी तपासाला गती दिली आहे. अपघात घडवून पळालेली थार गाडी परंडा मार्गे बार्शीकडे गेल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले असून हिट अँड रन प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तसेच अन्य तांत्रिक पुराव्यांच्या आधारे फरार चालकाचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.
या दुर्दैवी घटनेमुळे वारदवाडी, खांडवी तसेच परिसरातील नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून दोषी चालकाचा तातडीने शोध घेऊन कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *