समतानगर, कुर्डुवाडी रोड येथील दुर्दैवी घटना; पोलीस ठाण्यात चालकाविरोधात गुन्हा दाखल
यशश्री अपडेट्स|परंडा (प्रतिनिधी): निष्काळजीपणाने व भरधाव वेगात ट्रॅक्टर चालवून झालेल्या भीषण अपघातात एका ४० वर्षीय सुरक्षा रक्षक व शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना परंडा शहरात घडली आहे. हा अपघात शनिवारी, दिनांक १ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६:३० वाजेच्या सुमारास समतानगर झोपडपट्टीलगत, कुर्डुवाडी रोडवर घडला. नितीन नागनाथ गुडे (वय ४०, रा. आवारपिंपरी, ता. परंडा, जि. धाराशिव) असे या अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
अपघाताचा थरार
मिळालेल्या माहितीनुसार, नितीन गुडे हे परंडा शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतीगृह येथे शिपाई म्हणून कार्यरत होते. १ ऑगस्ट रोजी सायंकाळी 6:३० वाजेच्या सुमारास ते आपल्या दुचाकीवरून गावाकडे (आवारपिंपरी) निघाले होते.
त्याच वेळी आरोपी ट्रॅक्टर चालक संतोष बाळू कापरे (रा. कुडू, ता. माढा, जि. सोलापूर) हा आपल्या ताब्यातील ‘स्वराज्य’ कंपनीचा ट्रॅक्टर (क्र. MH 26 BQ 8503) व त्यास जोडलेल्या दोन ट्रॉल्या (क्र. MH 13 T 1805 व MH 13 T 8606) अतिशय निष्काळजीपणाने व भरधाव वेगात घेऊन जात होता. समतानगर परिसरात ट्रॅक्टरच्या पहिल्या ट्रॉलीचा जोराचा धक्का लागल्याने नितीन गुडे दुचाकीवरून खाली पडले आणि ट्रॉली त्यांच्या अंगावरून गेल्याने ते गंभीर जखमी झाले.
उपचारापूर्वीच मृत्यू व नागरिकांचा पुढाकार
अपघातानंतर होमगार्ड दत्ता मेहर यांच्यासह स्थानिक नागरिकांनी तातडीने मदत करत गुडे यांना उपचारासाठी परंडा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले. अपघातानंतर नागरिकांनी ट्रॅक्टरसह चालक संतोष कापरे याला परंडा पोलिसांच्या ताब्यात दिले.
घटनेची माहिती मिळताच शिवसेना (ठाकरे गट) नेते विश्वजित पाटील यांनी परंडा रुग्णालयात जाऊन मृत नितीन गुडे यांच्या नातेवाईकांचे सांत्वन केले. मयत नितीन गुडे यांच्या पश्चात पत्नी, एक लहान मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे.
पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
या प्रकरणी मयताचा भाऊ अंगद नागनाथ गुडे (वय ३९, रा. आवारपिंपरी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी ट्रॅक्टर चालक संतोष कापरे याच्याविरुद्ध परंडा पोलीस ठाण्यात विविध कलमांनुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक आसाराम चोरमले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार शिंदे हे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
