मंदिरात चोरी : तपासासाठी शिखरावर बसून ग्रामस्थांचे आमरण उपोषण सुरू; आज दुसरा दिवस

एका महिलेसह सहाजण उपोषणाला; रात्रभर मंदिराच्या शिखरावर ठिय्या — ३० सप्टेंबरच्या चोरीचा तातडीने तपास करण्याची मागणी

यशश्री अपडेट्स | परंडा : तालुक्यातील तीर्थक्षेत्र कंडारी येथील श्री काळभैरवनाथ जोगेश्वरी मंदिरात ३० सप्टेंबर रोजी झालेल्या चोरीच्या घटनेचा तपास जलद गतीने करून चोरट्यांना तात्काळ अटक करावी, चोरीस गेलेले दागिने, मौल्यवान वस्तू तसेच देवीचा मुखवटा शोधून परत मिळवावा, या प्रमुख मागण्यांसाठी कंडारी ग्रामस्थांनी मंदिराच्या शिखरावर बसून आमरण उपोषण आंदोलन सुरू केले आहे. बुधवारी (दि. ७) सुरू झालेले हे आंदोलन आज दुसऱ्या दिवशीही सुरू असून, उपोषणकर्ते रात्रभर मंदिराच्या शिखरावरच ठिय्या देत आहेत.

या आंदोलनात अमोल तिंबोले, रामदास डांगे, राहुल गडवे, सचिन तिबोले, ब्रह्मदेव तिंबोले आणि मंगल क्षीरसागर असे सहाजण सहभागी झाले आहेत. यामध्ये एका महिलेचाही समावेश आहे. मंदिरातील चोरीचा तपास तातडीने पूर्ण करून दोषींवर कठोर कारवाई होईपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचा निर्धार ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.

३० सप्टेंबरला मंदिरात चोरी

कंडारी येथील श्री काळभैरवनाथ जोगेश्वरी मंदिरात ३० सप्टेंबर रोजी चोरट्यांनी प्रवेश करून मंदिरातील दागिने व इतर मौल्यवान वस्तू लंपास केल्या. विशेष म्हणजे चोरट्यांनी देवीचा मुखवटाही चोरी करून नेला. त्यामुळे या घटनेमुळे ग्रामस्थांसह परिसरातील भाविकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

ग्रामस्थांच्या मते, ही घटना केवळ चोरीपुरती मर्यादित नसून हजारो भाविकांच्या श्रद्धेला आणि धार्मिक भावनांना धक्का देणारी गंभीर बाब आहे. त्यामुळे पोलीस व प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन तपासाला गती देणे गरजेचे असल्याची मागणी करण्यात येत आहे.

तहसीलदारांना निवेदन

या प्रकरणी कंडारी ग्रामस्थांच्या वतीने दि. ३ ऑक्टोबर रोजी परंडा तहसीलदारांना निवेदन देण्यात आले होते. या निवेदनातून मंदिरातील चोरीचा तात्काळ तपास करून दोषींना अटक करण्याची मागणी करण्यात आली होती. तसेच चोरीस गेलेले दागिने, मौल्यवान वस्तू आणि देवीचा मुखवटा शोधून परत मिळवावा, अशीही मागणी करण्यात आली होती.

सुरक्षा व्यवस्था मजबूत करण्याची मागणी

मंदिर परिसरात भविष्यात अशा प्रकारच्या घटना घडू नयेत यासाठी सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. मंदिर परिसरात प्रभावी सीसीटीव्ही कॅमेरे, पुरेशी प्रकाश व्यवस्था आणि इतर आवश्यक सुरक्षा उपाययोजना तातडीने कार्यान्वित कराव्यात, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

तसेच चोरीच्या घटनेमागे कोणी व्यक्ती किंवा इतर संबंधित घटक असल्यास त्यांची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी. तपासाची सद्यस्थिती ग्रामस्थ व भाविकांना स्पष्टपणे सांगावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.

‘अन्यथा संपूर्ण गाव आंदोलनात उतरेल’

मंदिरातील चोरीच्या घटनेचा तपास तातडीने करून दोषींना अटक न केल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. प्रशासनाने मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास संपूर्ण गाव आंदोलनात उतरविण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.

दरम्यान, बुधवारी सुरू झालेले आमरण उपोषण गुरुवारी दुसऱ्या दिवशीही सुरू असून, उपोषणकर्ते रात्रभर मंदिराच्या शिखरावर बसून आंदोलन करत आहेत. त्यामुळे प्रशासन या आंदोलनाची दखल घेऊन मंदिर चोरीप्रकरणी तपासाला गती देणार का आणि ग्रामस्थांच्या मागण्यांवर कोणती कार्यवाही करणार, याकडे कंडारीसह परिसरातील भाविकांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!