कळंबमध्ये धक्कादायक घटना! पाच वर्षीय मुलासमोर आईची दगडाने ठेचून हत्या

हासेगाव शिवारातील धक्कादायक घटना; पाच वर्षीय मुलाच्या डोळ्यांसमोर घडला प्रकार

यशश्री अपडेट्स | कळंब : कळंब शहरालगतच्या हासेगाव शिवारात पतीने पत्नीच्या डोक्यात आणि चेहऱ्यावर दगडाने वार करून तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना बुधवारी (७ ऑक्टोबर) सायंकाळी चार ते पाच वाजण्याच्या सुमारास घडली. कोमल विनायक टेकाळे (वय २८, रा. पुनर्वसन सावरगाव, कळंब) असे मृत महिलेचे नाव आहे. विशेष म्हणजे, पोटच्या अवघ्या पाच वर्षीय मुलाच्या डोळ्यांसमोरच आईवर हल्ला झाल्याने या घटनेने परिसर हादरला असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

पतीकडून पत्नीला मारहाण केल्याची माहिती

पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, कोमल यांचा सुमारे सहा-सात वर्षांपूर्वी विनायक शिवाजी टेकाळे याच्याशी विवाह झाला होता. विनायक हा मद्यपान करून पत्नीला मारहाण करत असल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली आहे. त्यामुळे पती-पत्नीमध्ये यापूर्वीही वाद होत असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

बुधवारी विनायक हा पत्नी कोमल आणि त्यांच्या पाच वर्षीय मुलाला घेऊन कळंब शहरात आला होता. शहरात आल्यानंतर त्याने मुलाला आणि पत्नीला हॉटेलमध्ये ज्यूस दिला. त्यानंतर ते मंदिरात गेल्याची माहिती पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आली आहे.

हासेगाव शिवारातील शेतात नेऊन हल्ला

मंदिरातून बाहेर पडल्यानंतर विनायक याने पत्नीला आणि मुलाला हासेगाव शिवारातील मानधने पेट्रोलपंपासमोरील शेतात नेले. तेथे त्याने कोमल यांच्या डोक्यावर आणि चेहऱ्यावर दगडाने जोरदार वार केले. या हल्ल्यात त्या गंभीर जखमी झाल्या आणि त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.

हा संपूर्ण प्रकार कोमल यांच्या पाच वर्षीय मुलाच्या डोळ्यांसमोर घडला. आईवर दगडाने हल्ला होत असताना तो घटनास्थळीच उपस्थित होता. हल्ल्यानंतर कोमल रक्ताच्या थारोळ्यात पडल्या. त्यांच्या अंगावरील रक्त मुलाच्या कपड्यांवरही माखले.

आईला उठविण्याचा प्रयत्न; प्रतिसाद न मिळाल्याने रस्त्याकडे धाव

आईला रक्ताच्या थारोळ्यात पडलेले पाहून पाच वर्षीय मुलाने तिला उठविण्याचा प्रयत्न केला. मात्र, आईकडून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याचे लक्षात आल्यानंतर तो घाबरला. त्यानंतर त्याने घटनास्थळावरून रस्त्याच्या दिशेने धाव घेतली.

रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांना त्याने आईला मारहाण झाल्याची माहिती दिली. मुलाची अवस्था आणि त्याच्या कपड्यांवरील रक्त पाहून नागरिकही हादरून गेले. नागरिकांनी तत्काळ घटनेची माहिती पोलिसांना दिली.

हल्ल्याचे चित्रीकरण केल्याची माहिती

दरम्यान, या प्रकरणात आणखी धक्कादायक बाब समोर आली आहे. पत्नीवर हल्ला करतानाचे चित्रीकरण आरोपीने स्वतः केले असून हा व्हिडिओ त्याने आपल्या मित्राला पाठविल्याची माहिती पोलिसांच्या तपासात समोर आली आहे. या व्हिडिओसह अन्य उपलब्ध पुराव्यांच्या आधारे पोलिसांकडून तपास सुरू आहे.

घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करण्यासह संबंधित बाबींची माहिती घेतली. हत्येमागील नेमके कारण काय होते, याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.

चारित्र्याच्या संशयासह विविध शक्यतांचा तपास

पती-पत्नीमधील वाद, मद्यपानातून होणारी मारहाण तसेच चारित्र्याच्या संशयासह अन्य संभाव्य कारणांचाही तपास पोलिसांकडून केला जात आहे. हत्येपूर्वी दोघांमध्ये नेमका काय वाद झाला होता, हल्ला कोणत्या परिस्थितीत करण्यात आला आणि या घटनेमागे आणखी कोणते कारण आहे, याचा शोध घेण्यासाठी पोलिस तपास सुरू आहे.

या घटनेमुळे हासेगाव शिवारासह कळंब परिसरात खळबळ उडाली आहे.

एकुलत्या एक मुलीचा दुर्दैवी अंत

मृत कोमल या करंजकल्ला येथील बंडू पवार यांच्या एकुलत्या एक कन्या होत्या. त्यामुळे त्यांच्या मृत्यूची बातमी समजताच माहेरच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. विशेषतः पाच वर्षीय मुलाच्या डोळ्यांसमोर आईचा झालेला अंत ही बाब मन हेलावून टाकणारी ठरली आहे.

पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, हत्येचे नेमके कारण आणि घटनेतील सर्व बाबी तपासानंतर स्पष्ट होणार आहेत.

Leave a Reply

error: Content is protected !!