कळंब (यशश्री अपडेट्स): कळंब शहरात गेल्या काही दिवसांपासून वाढणाऱ्या वाहन चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी कळंब पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी एका सराईत संशयिताला ताब्यात घेतले असून, त्याच्याकडून चोरीच्या ४ मोटारसायकल जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे. या कारवाईमुळे वाहन चोरांचे धाबे दणाणले आहेत.
संशयावरून ताब्यात घेतले अन् गुन्ह्यांची मालिका उघड झाली!
शहरात सातत्याने होणाऱ्या मोटारसायकल चोरीच्या तक्रारींनंतर पोलीस निरीक्षक शकील शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तपास चक्र गतीमान केली होती. गुप्त बातमीदार आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी लखन उर्फ उमेश उत्रेश्वर दळवी (वय २४, रा. कळंब) या तरुणाला संशयावरून ताब्यात घेतले.
सुरवातीला उडवाउडवीची उत्तरे देणाऱ्या लखनची पोलिसांनी जेव्हा पोलिसी खाक्या दाखवत कसून चौकशी केली, तेव्हा त्याने एकापाठोपाठ एक तब्बल ४ मोटारसायकली चोरल्याची धक्कादायक कबुली दिली.
७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
पोलिसांनी आरोपीच्या ताब्यातून वेगवेगळ्या कंपन्यांच्या ४ मोटारसायकली जप्त केल्या आहेत. यामध्ये:
- HF Deluxe
- Splendor Plus
- Twister
- एक अन्य मोटारसायकल
या सर्व वाहनांची एकूण अंदाजे किंमत ७०,०००/- रुपये असून पोलिसांनी हा सर्व मुद्देमाल जप्त केला आहे. जप्त करण्यात आलेल्या गाड्यांपैकी ३ गाड्या कळंब शहरात दाखल असलेल्या वेगवेगळ्या चोरीच्या गुन्ह्यांशी संबंधित असल्याचे निष्पन्न झाले आहे. उर्वरित १ गाडी त्याने कुठून चोरली, याचा तपास पोलीस करत आहेत.
पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी कारवाई
ही धडक कारवाई धाराशिवच्या पोलीस अधीक्षक रितू खोकर, अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कळंब पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शकील शेख यांच्या पथकाने केली.
या पथकात पोलीस अंमलदार पोहेकॉ अजिज शेख, जुबेर काजी, पोअं परमेश्वर कदम आणि अमोल माळी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. संशयित आरोपीवर वाहन चोरीचे गुन्हे दाखल करण्यात आले असून, त्याने जिल्ह्यात आणखी काही ठिकाणी अशा चोऱ्या केल्या आहेत का, याचा पुढील तपास कळंब पोलीस करत आहेत. शहातील नागरिकांनी आपल्या गाड्या सुरक्षित ठिकाणी पार्क कराव्यात, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
