धाराशिव लातूर बीड स्थानिक प्राधिकरणात ऐतिहासिक विजय; आमदार बसवराज पाटील यांचा भव्य सत्कार, खासदार ओमराजे निंबाळकर व माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती

यशश्री अपडेट्स|धाराशिव:

धाराशिव-लातूर-बीड स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद निवडणुकीत मिळालेल्या ऐतिहासिक विजयाबद्दल नवनिर्वाचित आमदार बसवराज पाटील यांच्या भव्य सत्कार सोहळ्याचे आयोजन धाराशिव शहरात करण्यात आले होते. ॲड. व्यंकट गुंड पाटील आणि रुपामाता परिवाराच्या वतीने शहरातील परिमल मंगल कार्यालय येथे हा सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला.

पक्षांतर्गत असंतोष आणि आमदारांना डावलल्याची चर्चा

या सत्कार सोहळ्याला राजकीयदृष्ट्या विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. भाजप प्रदेश सदस्य ॲड. अनिल काळे यांच्या कथित अपमानाचे पडसाद अजूनही धाराशिवच्या राजकीय वर्तुळात उमटत असून, या घटनेनंतर भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. याच असंतोषातून आयोजित या कार्यक्रमाला स्थानिक भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांना मात्र निमंत्रित करण्यात आले नव्हते. स्थानिक आमदारांना उघडपणे डावलल्यामुळे धाराशिव भाजपमधील अंतर्गत गटबाजी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे.

व्यासपीठावर दिग्गज नेत्यांची उपस्थिती आणि गुप्त चर्चा

परिमल मंगल कार्यालयातील या सोहळ्याला शिवसेना (शिंदे) गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर तसेच भाजपचे माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती होती. आमदार राणा पाटील यांचे कट्टर राजकीय विरोधक मानले जाणारे खासदार ओमराजे निंबाळकर यांना कार्यक्रमात मानाचे स्थान देण्यात आले. व्यासपीठावर आमदार बसवराज पाटील आणि खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यात बराच वेळ रंगलेली गुप्त चर्चा (गुफ्तगू) उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होती.

राजकीय वर्तुळात नव्या समीकरणांची नांदी?

एकीकडे भाजपमधील निष्ठावंतांची एकजूट, आमदार राणा पाटील यांना डावलणे आणि दुसरीकडे व्यासपीठावर ओमराजे निंबाळकर व सुजितसिंह ठाकूर यांच्यासारख्या नेत्यांची एकत्र उपस्थिती, यामुळे धाराशिवच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत असल्याचे स्पष्ट होत आहे. या सत्कार सोहळ्यातील नेत्यांची जवळीक आणि चर्चा आगामी काळातील नव्या राजकीय समीकरणांचे संकेत देत असून, भाजपचे वरिष्ठ नेतृत्व यावर काय पावले उचलते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!