सोशल मीडियावरील वाद विकोपाला; पिस्तुल दाखवत धमकी, चार जणांवर गुन्हा


यशश्री अपडेट्स | परंडा प्रतिनिधी
पत्नीच्या इंस्टाग्राम खात्यावर वारंवार फ्रेंड रिक्वेस्ट पाठवल्याचा जाब विचारल्याच्या कारणावरून एका तरुणाला पिस्तुल दाखवून जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना परंडा तालुक्यात घडली. या प्रकरणी पीडित तरुण आणि पोलिस कर्मचारी यांच्या स्वतंत्र फिर्यादीवरून परंडा पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
फिर्यादी विकास सुनील जगताप (वय २९, रा. परंडा) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, रोसा येथील महादेव संतोष नलवडे हा त्यांच्या पत्नीच्या इंस्टाग्राम आयडीवर वारंवार फ्रेंड रिक्वेस्ट पाठवत होता. याबाबत ९ जून रोजी रात्री डोमगाव फाटा येथे विकास यांनी महादेवला जाब विचारून पुन्हा रिक्वेस्ट न पाठवण्याची सूचना केली होती.
याचा राग मनात धरून त्याच रात्री रोसा बसस्टॉप येथे गणेश संतोष नलवडे व त्याच्या तीन साथीदारांनी विकास जगताप यांना अडवले. यावेळी गणेशने शिवीगाळ करत कमरेला लावलेले पिस्तुल दाखवून “दोन दिवसांत तुझा गेम करतो” अशी धमकी दिल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. त्यानंतर विकास जगताप यांनी डायल ११२ वर संपर्क साधून पोलिसांना माहिती दिली आणि परंडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
दरम्यान, डायल ११२ वरून मिळालेल्या माहितीनुसार घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी तपास केला असता, संशयित गणेश नलवडे यांच्या घरामागील गवतात लपवून ठेवलेली सुमारे दोन हजार रुपये किमतीची एअर पिस्तुल जप्त केली. याप्रकरणी पोलीस नाईक श्रीकांत अरुण भांगे यांनी स्वतंत्र फिर्याद दिली आहे.
तपासादरम्यान गणेश नलवडे याने जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याचे निष्पन्न झाले. तसेच त्याचे वडील संतोष नलवडे, आई शोभा संतोष नलवडे आणि भाऊ महादेव नलवडे यांनी त्याला या कृत्यासाठी अपप्रेरित केल्याचा आरोप असल्याने या सर्वांविरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १३५ व बीएनएस कलम ४९ अन्वये स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक आसाराम चोरमले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस फौजदार गजानन मुळे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *