परंडा | यशश्री अपडेट्स
जागतिक युवा कौशल्य दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय स्तरावरील स्किल क्विझ स्पर्धेत परंडा येथील कल्याणस्वामी महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या (आयटीआय) वीजतंत्री व्यवसायाच्या प्रशिक्षणार्थी यश विष्णू जाधव याने देशात सातवा क्रमांक पटकावत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या यशामुळे परंडा शहरासह धाराशिव जिल्ह्याच्या शैक्षणिक क्षेत्रात अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
ड्युअल वेट प्रोजेक्ट (सिमेन्स आणि टाटा स्ट्रॉइव्ह) यांच्या संयुक्त विद्यमाने १५ जुलै रोजी जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त भारतातील पाच राज्यांमध्ये ऑनलाइन पद्धतीने या स्किल क्विझ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत महाराष्ट्रासह पश्चिम बंगाल, ओडिशा आणि इतर राज्यांतील शासकीय तसेच खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील मोठ्या संख्येने प्रशिक्षणार्थींनी सहभाग घेतला होता.
या स्पर्धेतून संपूर्ण देशातून केवळ दहा विजेत्यांची निवड करण्यात आली. त्यामध्ये महाराष्ट्रातील सात, पश्चिम बंगालमधील दोन आणि ओडिशामधील एका प्रशिक्षणार्थ्याची निवड झाली. या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत परंडा येथील कल्याणस्वामी महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा प्रशिक्षणार्थी यश विष्णू जाधव याने देशात सातवा क्रमांक पटकावत संस्थेचे आणि जिल्ह्याचे नाव उज्ज्वल केले.
यश जाधवच्या या यशाबद्दल छत्रपती संभाजीनगर विभागाचे सहसंचालक प्रदीप दुर्गे, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी प्रविण औताडे तसेच जिल्ह्यातील विविध शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांच्या प्राचार्यांनी त्याचे अभिनंदन केले.

या यशानिमित्त संस्थेत विशेष सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला. संस्थेचे प्राचार्य केशव पवार, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था तुळजापूरचे प्राचार्य एम. एस. बिरादार, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था धाराशिवचे गटनिदेशक एस. टी. राउत, शिल्पनिदेशक डॉ. किरण झरकर तसेच ड्युअल वेट प्रोजेक्ट (सिमेन्स आणि टाटा स्ट्रॉइव्ह) यांच्या वतीने धाराशिव जिल्हा प्रकल्प समन्वयक महेश शिंदे यांच्या हस्ते यश जाधवचा सत्कार करण्यात आला.
यावेळी संस्थेतील सर्व शिल्पनिदेशक, कर्मचारी, प्रशिक्षणार्थी आणि मान्यवर उपस्थित होते. उपस्थितांनी यश जाधवच्या मेहनतीचे कौतुक करत त्याच्या पुढील शैक्षणिक आणि व्यावसायिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
राष्ट्रीय स्तरावरील या यशामुळे कल्याणस्वामी महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, परंडा येथील कौशल्याधारित प्रशिक्षणाची गुणवत्ता अधोरेखित झाली असून ग्रामीण भागातील विद्यार्थीदेखील राष्ट्रीय पातळीवर उल्लेखनीय कामगिरी करू शकतात, हे यश जाधवने सिद्ध करून दाखवले आहे. त्याच्या या यशामुळे संस्थेतील इतर प्रशिक्षणार्थींनाही प्रेरणा मिळणार असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
