यशश्री अपडेट्स | धाराशिव प्रतिनिधी
राज्य सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी ही शेतकऱ्यांची दिशाभूल करणारी असून सर्व पात्र शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी, तसेच धाराशिव जिल्ह्यातून प्रस्तावित शक्तिपीठ महामार्गाचा आराखडा तात्काळ रद्द करावा, या प्रमुख मागण्यांसाठी धाराशिव जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात आले. आंदोलनानंतर विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले.
जिल्हाध्यक्ष उमेश राजेनिंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी राज्य सरकारच्या धोरणांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. वाढते उत्पादन खर्च, अवकाळी पाऊस, दुष्काळी परिस्थिती आणि शेतीमालाला मिळत नसलेला योग्य भाव यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला असताना सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी अपुरी व फसवी असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला.
यावेळी प्रस्तावित शक्तिपीठ महामार्गामुळे हजारो एकर सुपीक शेती, फळबागा आणि शेतकऱ्यांच्या उपजीविकेवर गंभीर परिणाम होणार असल्याने हा महामार्ग तात्काळ रद्द करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली. शेतकरी आणि स्थानिक नागरिकांचा सातत्याने विरोध असतानाही शासन त्याकडे दुर्लक्ष करत असल्याबद्दल काँग्रेसने तीव्र नाराजी व्यक्त केली.
आंदोलनादरम्यान काँग्रेस कार्यकर्त्यांनी राज्य सरकारच्या कर्जमाफीच्या शासन निर्णयाची (जीआर) प्रतीकात्मक होळी करून निषेध नोंदविला. “फसवी कर्जमाफी रद्द करा”, “शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्या” आणि “शक्तिपीठ महामार्ग रद्द करा” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. सरकारच्या शेतकरीविरोधी आणि जनविरोधी धोरणांविरोधात कार्यकर्त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला.
निवेदनामध्ये सर्व पात्र शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी, शेतीमालाला हमीभावासह खरेदीची हमी, शक्तिपीठ महामार्गाचा आराखडा रद्द करणे तसेच शेतकरी, कामगार, युवक आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांवर तातडीने सकारात्मक निर्णय घेण्याची मागणी करण्यात आली.
यावेळी जिल्हाध्यक्ष उमेश राजेनिंबाळकर, विश्वास शिंदे, नानासाहेब पाटील, महादेव कुतवळ, धीरज पाटील, पांडुरंग कुंभार, शिला उंबरे, डॉ. स्मिता शाहपूरकर, ज्योती सपाटे, नानाभाऊ भोसले, मधुकर बिद्री, राजाभाऊ शेरखाने, प्रशांत पाटील, खलील सय्यद, विनोद वीर, विलास शाळू, महेबूब पटेल, अर्जुन बिराजदार, रुपेश शेंडगे, अभिजित चव्हाण, धनंजय राऊत, अग्निवेश शिंदे, बापू शेळके, आप्पासाहेब शेळके, अशोक भातलवंडे, ॲड. मुशर्रफ सय्यद, विजय वाघमारे, अमोल कुतवळ, गोविंद हरकर, सर्फराज काझी, जावेद काझी, अभिषेक बागल, गणेश पवार, मोईज सय्यद, भूषण देशमुख, दत्ता तांबे, बालाजी हुबाळे, गणपती कांबळे, लक्ष्मीकांत खटके, ॲड. सिराज मोगल, राजूदास आडे, दिगंबर गायकवाड, धीरज सोनवणे, जीवन चौगुले, हनुमंत सांगावे, चंद्रकांत माळी, सलमान शेख, संकेत पडवळ, समी काझी, मधुकर यादव, विजय देवगुडे आणि शिवाजी गायकवाड यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फसवी कर्जमाफीच्या निषेधार्थ काँग्रेस आक्रमक; शक्तिपीठ महामार्ग रद्दची जोरदार मागणी
