जनता बँकेचा कारभार आता केवळ 4 संचालकांच्या खांद्यावर; 7 अपात्र, निवडणुका तोंडावर

यशश्री अपडेट्स | धाराशिव प्रतिनिधी

धाराशिव येथील जनता सहकारी बँकेच्या सात संचालकांना रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) अपात्र ठरवल्यानंतर बँकेच्या प्रशासकीय व आर्थिक कारभाराबाबत विविध प्रश्न उपस्थित होत आहेत. 14 सदस्यीय संचालक मंडळातील सात संचालक अपात्र, दोन संचालकांचे निधन आणि एका सदस्याची पूर्वीच अपात्रता झाल्याने आता बँकेचा संपूर्ण कारभार केवळ चार संचालकांच्या खांद्यावर आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अपात्र ठरविण्यात आलेल्या सात संचालकांना पदावरून हटविण्याबाबतचा अहवाल बँकेने रिझर्व्ह बँकेकडे पाठविला आहे. दरम्यान, बँकेच्या विद्यमान संचालक मंडळाचा पाच वर्षांचा कार्यकाळ ऑक्टोबर-नोव्हेंबर 2026 मध्ये संपणार असून पुढील चार ते पाच महिन्यांत निवडणूक प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

निर्णय प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह

बँकेच्या धोरणात्मक, प्रशासकीय आणि आर्थिक निर्णयांमध्ये संचालक मंडळाची भूमिका महत्त्वाची असते. कर्ज मंजुरी, मोठ्या आर्थिक व्यवहारांना मंजुरी, एकरकमी तडजोड (OTS) यांसारख्या बाबींसाठी संचालक मंडळाचे निर्णय आवश्यक असतात. सध्या आवश्यक कोरम उपलब्ध असल्याचा दावा केला जात असला तरी भविष्यातील मोठे आर्थिक निर्णय विद्यमान चार संचालक घेणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

यापूर्वी कर्जवाटप, एकरकमी तडजोड आणि त्यातून मिळालेल्या कथित लाभांबाबत बँकेत अनेकदा आरोप-प्रत्यारोप झाले आहेत. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत घेतल्या जाणाऱ्या निर्णयांवरही बारकाईने नजर ठेवली जाणार आहे.

सात संचालक अपात्र

रिझर्व्ह बँकेने लागू केलेल्या नवीन नियमांनुसार कोणताही संचालक सलग दहा वर्षांपेक्षा अधिक काळ सहकारी बँकेच्या संचालकपदी राहू शकत नाही. या नियमाच्या आधारे पिराजी मंजुळे यांनी केलेल्या तक्रारीची दखल घेत सात संचालकांना अपात्र ठरविण्याची कारवाई करण्यात आली.

अपात्र ठरलेल्या संचालकांमध्ये माजी आमदार वैजीनाथ शिंदे, विश्वास शिंदे, सुभाष धनुरे, तानाजी चव्हाण, करुणा पाटील, हरी रामजीवन सूर्यवंशी आणि नंदकुमार नागदे यांचा समावेश आहे.

तसेच संचालक निवृत्तीराव भोसले आणि सुभाष गोविंदपूरकर यांचे निधन झाले असून त्यामुळे संचालक मंडळातील रिक्त जागांची संख्या आणखी वाढली आहे.

निवडणुकांचे वारे

जनता बँकेच्या संचालक मंडळाचा कार्यकाळ संपण्यास अवघे काही महिने उरले आहेत. अपात्र ठरलेले संचालक आगामी निवडणुकीत उमेदवारी करू शकणार नसल्याने अनेकजण आपल्या नातेवाईकांना किंवा राजकीय वारसांना पुढे आणण्याची तयारी करत असल्याची चर्चा बँक वर्तुळात सुरू आहे.

2021 च्या निवडणुकीतील विजयी उमेदवार

2021 मध्ये झालेल्या संचालक मंडळ निवडणुकीत उस्मानाबाद तालुका गटातून विश्वास शिंदे, वसंतराव नागदे आणि आशिष मोदाणी, जिल्हा गटातून तानाजी चव्हाण, सुभाष गोविंदपूरकर आणि प्रदीप पाटील, महाराष्ट्र गटातून वैजिनाथ शिंदे, निवृत्ती भोसले आणि सुभाष धनुरे, महाराष्ट्राबाहेरील गटातून नंदकुमार नागदे, महिला गटातून पंकजा पाटील व करुणा पाटील, तर मागासवर्गीय गटातून राजीव पाटील यांनी विजय मिळविला होता.

रिझर्व्ह बँकेच्या कारवाईनंतर जनता सहकारी बँकेच्या आगामी निवडणुकांकडे आता सभासद, ठेवीदार आणि सहकार क्षेत्राचे विशेष लक्ष लागले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *