स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कामगिरी; चिंचपूर खुर्द खून प्रकरणातील आरोपी ताब्यात


यशश्री अपडेट्स | परंडा प्रतिनिधी
परंडा तालुक्यातील चिंचपूर खुर्द येथील बहुचर्चित खून प्रकरणातील फरार मुख्य आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कर्नाटकातील बसवकल्याण येथून शिताफीने अटक केली आहे.
आंबी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 93/2026 अंतर्गत भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 103(1) व 3(5) नुसार खुनाचा गुन्हा दाखल असून, या प्रकरणातील मुख्य आरोपी दीपक विक्रम गरड (रा. चिंचपूर खुर्द, ता. परंडा, जि. धाराशिव) हा गुन्ह्यानंतर फरार होता.
फरार आरोपी कर्नाटकातील बसवकल्याण (जि. बीदर) येथे लपून बसल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. त्यानुसार पोलीस अधीक्षक रितू खोखर व अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार यांच्या आदेशानुसार विशेष पथक कर्नाटकात रवाना करण्यात आले.
पथकाने माहितीच्या आधारे आरोपीचा शोध घेत असताना त्याने पोलिसांना पाहून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी तत्काळ पाठलाग करून त्याला शिताफीने पकडले आणि ताब्यात घेतले. त्यानंतर पुढील कायदेशीर कारवाईसाठी आरोपीला आंबी पोलीस ठाण्याच्या स्वाधीन करण्यात आले.
ही यशस्वी कारवाई पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन खटके, पोलीस हवालदार विनोद जानराव, नितीन जाधवर, बबन जाधवर तसेच पोलीस अंमलदार रोहित दंडनाईक यांच्या पथकाने पार पाडली.
या कारवाईमुळे चिंचपूर खुर्द खून प्रकरणाच्या तपासाला गती मिळाली असून परिसरात समाधान व्यक्त केले जात आहे. :::

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *