यशश्री अपडेट्स–धाराशिव | प्रतिनिधी
उस्मानाबाद-लातूर-बीड स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या द्विवार्षिक विधान परिषद निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर निवडणूक प्रक्रियेचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत निवडणूक निरीक्षक मिलिंद बोरकर यांनी प्रशासनाला महत्त्वपूर्ण सूचना दिल्या. निवडणूक आचारसंहितेचे काटेकोर पालन करून निवडणूक निर्भय, नि:पक्षपाती आणि मुक्त वातावरणात पार पडेल याची दक्षता घ्यावी, असे निर्देश त्यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात बुधवारी (दि. ३ जून) झालेल्या बैठकीस जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी कीर्ती किरण पुजार, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियंवदा म्हाडदळकर, पोलीस अधीक्षक रितू खोखर, अपर जिल्हाधिकारी ज्योती पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश काळे, निवासी उपजिल्हाधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी विद्याचरण कडवकर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी शिरीष यादव यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. लातूर व बीड जिल्ह्यातील अधिकारी ऑनलाइन माध्यमातून सहभागी झाले.
बैठकीत मार्गदर्शन करताना बोरकर यांनी सांगितले की, राष्ट्रीयकृत बँकांचे अधिकारी सूक्ष्म निरीक्षक म्हणून कार्यरत राहणार असून त्यांची यादी तातडीने तयार करण्यात यावी. मतदान साहित्याचे वितरण व स्वीकृती प्रक्रिया सुरळीत पार पाडावी. तसेच मतदानानंतर सीलबंद मतपेट्यांची वाहतूक कडक सुरक्षा व्यवस्थेत करण्यात यावी. या संपूर्ण प्रक्रियेत कोणतीही त्रुटी राहणार नाही याची विशेष काळजी घेण्याचे निर्देश त्यांनी दिले.
मतदान प्रक्रियेचे वेबकास्टिंग करण्यात यावे तसेच मतदान केंद्रांवरील माहिती वेळोवेळी संकलित करण्यावर भर देण्यात आला. दिव्यांग मतदारांसाठी रॅम्प व व्हीलचेअरची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.
निवडणूक काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, आचारसंहितेचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घ्यावी आणि प्राप्त तक्रारींवर तातडीने कार्यवाही करावी, असेही बोरकर यांनी स्पष्ट केले.
यावेळी जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी सर्व मतदान पथकांना तीन टप्प्यांमध्ये परिपूर्ण प्रशिक्षण देण्याच्या सूचना केल्या. निवडणूक प्रक्रिया पारदर्शक आणि नियमबद्ध राहण्यासाठी सर्व अधिकाऱ्यांनी समन्वयाने काम करावे, असे त्यांनी सांगितले.
उपजिल्हा निवडणूक अधिकारी शिरीष यादव यांनी निवडणुकीची माहिती देताना सांगितले की, या निवडणुकीत एकूण ९८८ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामध्ये जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या सदस्यांचा समावेश आहे. बीड जिल्हा परिषदेची निवडणूक अद्याप झालेली नसल्यामुळे त्या जिल्ह्यातील जिल्हा परिषद सदस्य मतदार यादीत समाविष्ट नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
उस्मानाबाद-लातूर-बीड स्थानिक प्राधिकारी मतदारसंघासाठी १८ जून २०२६ रोजी मतदान होणार असून प्रशासनाने निवडणुकीच्या तयारीला वेग दिला आहे.

