विधान परिषद निवडणुकीची तयारी वेगात; नोडल अधिकाऱ्यांना जबाबदाऱ्यांचे वाटप

यशश्री अपडेट्स-धाराशिव(प्रतिनिधी):
धाराशिव -लातूर-बीड स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या विधान परिषद द्विवार्षिक निवडणूक-२०२६ च्या पार्श्वभूमीवर निवडणूक प्रक्रिया सुरळीत, पारदर्शक आणि प्रभावीपणे पार पाडण्यासाठी विविध विभागांसाठी नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्या जबाबदाऱ्याही निश्चित करण्यात आल्या आहेत.

निवडणूक प्रक्रियेतील विविध कामकाजांचे समन्वय,आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी,कायदा व सुव्यवस्था, मतदान,मतमोजणी,निवडणूक साहित्य वितरण,माध्यमांचे संनियंत्रण तसेच विविध परवानग्यांसाठी स्वतंत्र अधिकाऱ्यांवर जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
यामध्ये अपर जिल्हाधिकारी ज्योती पाटील यांच्याकडे आदर्श आचारसंहिता (एमसीसी) नोडल अधिकाऱ्याची जबाबदारी देण्यात आली आहे.जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश काळे हे निवडणूक निरीक्षकांचे संपर्क अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत.
निवासी उपजिल्हाधिकारी विद्याचरण कडवकर हे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम करतील.यांच्याकडे नामनिर्देशन स्वीकृती कक्ष,कायदा व सुव्यवस्था,वाहन व्यवस्था जबाबदारी सोपविण्यात आली आहे.उपविभागीय अधिकारी ओंकार देशमुख हे मतमोजणी कक्ष तयार करण्यासाठी नोडल अधिकारी म्हणून कार्यरत राहतील.
उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) स्वाती शेंडे यांच्याकडे मतदान अधिकारी व कर्मचारी व्यवस्थापन कक्षाची जबाबदारी आहे.उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) अरुणा गायकवाड या अधिकारी व कर्मचारी प्रशिक्षण कक्षाच्या नोडल अधिकारी म्हणून कार्य पाहतील.
उपजिल्हाधिकारी (मध्यम प्रकल्प) संतोष राऊत यांच्याकडे निवडणूक साहित्य वितरण व स्ट्राँगरूम व्यवस्थापनाची जबाबदारी देण्यात आली आहे. उपजिल्हाधिकारी (रोहयो) प्रवीणकुमार धरमकर हे मतपत्रिका छपाई व वितरणाचे कामकाज पाहणार आहेत. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक हर्षवर्धन शिंदे यांच्याकडे अवैध दारू वाटप प्रतिबंध कक्षाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे हे माध्यम व संनियंत्रण समिती (एमसीएमसी) तसेच मीडिया व्यवस्थापनाचे नोडल अधिकारी म्हणून कार्यरत राहतील.तसेच तहसीलदार (संगायो) दत्तात्रय गायकवाड यांच्याकडे विविध परवानग्या व चौकशी कक्ष (एक खिडकी योजना) यांची जबाबदारी देण्यात आली आहे.
निवडणूक प्रक्रियेतील प्रत्येक टप्पा वेळेत व नियमांनुसार पार पडावा,तसेच संबंधित विभागांमध्ये प्रभावी समन्वय राहावा यासाठी या नियुक्त्या करण्यात आल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सर्व नोडल अधिकारी आपापल्या जबाबदाऱ्यांची प्रभावी अंमलबजावणी करणार असून निवडणूक प्रक्रिया निर्भय,निष्पक्ष आणि पारदर्शक वातावरणात पार पडण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *