AI अ‍ॅपद्वारे जादा परताव्याचे आमिष; 63.65 लाखांची ऑनलाइन फसवणूक

‘एआय ट्रेड’ कंपनीच्या दोन मालकांविरुद्ध गुन्हा दाखल; सायबर पोलिसांचा तपास सुरू

यशश्री अपडेट्स : धाराशिव | प्रतिनिधी

कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित ट्रेडिंगमधून अल्पावधीत मोठा आर्थिक परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवत एका 50 वर्षीय व्यक्तीची तब्बल 63 लाख 65 हजार रुपयांची ऑनलाइन फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात ‘एआय ट्रेड’ कंपनीच्या दोन मालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिद्राम यशवंत साखरे (रा. उमरगा चि., ता. तुळजापूर) यांना ‘एआय ट्रेड’ नावाच्या कंपनीमार्फत कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने शेअर ट्रेडिंग करून मोठा नफा मिळवून देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. यासाठी संबंधितांनी एक मोबाईल अ‍ॅप तयार करून त्यामध्ये गुंतवणुकीवर सातत्याने वाढता नफा दाखवत साखरे यांचा विश्वास संपादन केला.

दि. 14 नोव्हेंबर 2025 ते 17 नोव्हेंबर 2025 या कालावधीत आरोपींनी साखरे यांना नेट बँकिंगच्या माध्यमातून विविध बँक खात्यांमध्ये पैसे जमा करण्यास प्रवृत्त केले. त्यानुसार साखरे यांनी वेळोवेळी एकूण 63 लाख 65 हजार रुपये ऑनलाइन हस्तांतरित केले.

मात्र, गुंतवलेल्या रकमेवर कोणताही परतावा न मिळाल्याने तसेच संबंधितांकडून संपर्क टाळला जाऊ लागल्याने आपली फसवणूक झाल्याचे साखरे यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

या प्रकरणी गणेशराव रमेश गोपाळे आणि शंतनू रमेश गोपाळे (दोघे रा. बोरगाव नांदूर, ता. राहुरी, जि. अहिल्यानगर) या ‘एआय ट्रेड’ कंपनीच्या मालकांविरुद्ध सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सायबर पोलिस अधिक तपास करीत आहेत.

Leave a Reply

error: Content is protected !!