शालेय साहित्य वाटपासह शिष्यवृत्तीधारक गुणवंत विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार; प्राणजीत गवंडी यांच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक
यशश्री अपडेट्स|परंडा (प्रतिनिधी): आजच्या काळात वाढदिवसानिमित्त मोठे फ्लेक्स, डीजे आणि अवाजवी खर्चाचे अवडंबर माजवले जात असताना, परंडा तालुक्यातील मुगाव येथे या उधळपट्टीला फाटा देत एक अत्यंत स्तुत्य व कौतुकास्पद उपक्रम राबवण्यात आला. छत्रपती शासन ग्रुप हिंदुस्थानचे संस्थापक-अध्यक्ष तथा मुगाव जि. प. प्राथमिक शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शिवभक्त प्राणजीत गवंडी यांनी आपले चिरंजीव प्रेमराज प्राणजीत गवंडी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सामाजिक भान जपणारा शैक्षणिक व सामाजिक सोहळा पार पाडला.
विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व खाऊचे वाटप
या उपक्रमांतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुगाव आणि शिरगीरवाडी येथील विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते शालेय साहित्य (वह्या, पेन व शैक्षणिक वस्तू) तसेच खाऊचे वाटप करण्यात आले. शालेय जीवनातच विद्यार्थ्यांना अभ्यासाची गोडी लागावी आणि त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलावा, या हेतूने हे वाटप करण्यात आले.
शिष्यवृत्तीधारक गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव
केवळ साहित्य वाटपापुरते मर्यादित न राहता, मुगाव जि. प. प्राथमिक शाळेतील ज्या विद्यार्थ्यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करत शिष्यवृत्ती परीक्षेत (Scholarship Exam) उज्ज्वल यश संपादन करून पात्रता मिळवली, अशा गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन विशेष सत्कार करण्यात आला. या गौरवामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास द्विगुणीत झाला असून इतर विद्यार्थ्यांनाही प्रेरणा मिळाली आहे.
सामाजिक उत्तरदायित्वाचा आदर्श
या वेळी बोलताना उपस्थितांनी सांगितले की, वाढदिवसावर होणारा अवाजवी खर्च टाळून ग्रामीण भागातील शाळांमधील विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभे राहणे आणि त्यांच्या शिक्षणाला हातभार लावणे हा गवंडी परिवाराचा उपक्रम समाजाला एक नवी दिशा देणारा आहे. अशा प्रकारच्या उपक्रमांमुळे समाजकारणाची खरी व्याख्या अधोरेखित होते.
मान्यवरांची प्रमुख उपस्थिती
या सोहळ्याला छत्रपती शासन ग्रुप हिंदुस्थानचे संस्थापक-अध्यक्ष शिवभक्त प्राणजीत गवंडी यांच्यासह मुगाव-शिरगीरवाडी ग्रामपंचायतीचे उपसरपंच राजाभाऊ तानाजी हिवरे, शिरगीरवाडी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष भैरवनाथ हिवरे, शिरगीरे, सुनील ठवरे, हनुमंत हिवरे, चेतन शिरगीरे, लहु कारंडे, पै. स्वाभिमान शिंदे, पै. स्वप्नील गरदाडे, राजाभाऊ कारंडे आणि संदीप शिरगिरे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
तसेच कार्यक्रमास आनाळा केंद्राचे केंद्रप्रमुख डॉ. शिंदे, मुगाव शाळेचे मुख्याध्यापक विटकर सर, विटकर मॅडम, शिरगीरवाडी शाळेचे मुख्याध्यापक साळुंखे सर, रासकर सर, इतर शिक्षकवृंद आणि मुगाव-शिरगीरवाडी परिसरातील ग्रामस्थ व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सामाजिक उत्तरदायित्व जपत राबवण्यात आलेल्या या शैक्षणिक उपक्रमाचे मुगाव परिसरासह संपूर्ण परंडा तालुक्यातून विशेष कौतुक व अभिनंदन केले जात आहे.
