कुंभेफळ ग्रामपंचायतीतील दलित वस्ती निधी गैरव्यवहाराचा आरोप; सात दिवसांत चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश

यशश्री अपडेट्स | परंडा प्रतिनिधी

परंडा तालुक्यातील कुंभेफळ ग्रामपंचायतीमध्ये दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत मंजूर करण्यात आलेल्या निधीच्या वापराबाबत गंभीर अनियमितता झाल्याचा आरोप समोर आला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून सात दिवसांच्या आत अहवाल सादर करण्याचे आदेश गटविकास अधिकारी विजय गायकवाड यांनी पंचायत समितीच्या विस्तार अधिकारी एस. ए. कोटे यांना दिले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, कुंभेफळ येथील किशोर गायकवाड यांनी दि. २५ मे २०२६ रोजी पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दाखल केली होती. या तक्रारीत दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत करण्यात आलेल्या विविध विकासकामांमध्ये अनियमितता झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.

तक्रारीनुसार, दलित वस्तीतील पाणीपुरवठा कामासाठी सुमारे ४८ हजार २८७ रुपये तसेच पाण्याच्या टाकीच्या दुरुस्तीसाठी ९२ हजार २५० रुपये खर्च झाल्याचे दाखविण्यात आले आहे. मात्र प्रत्यक्ष पाहणी केल्यास संबंधित विकासकामे झालेली नसून केवळ कागदोपत्री कामे दाखवून शासनाचा निधी खर्च झाल्याचे दाखविण्यात आल्याचा आरोप तक्रारदारांनी केला आहे.

तसेच दलित वस्तीच्या विकासासाठी मंजूर झालेला निधी नेमका कुठे आणि कसा खर्च करण्यात आला, याची स्वतंत्र व निष्पक्ष चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.

या प्रकरणात ग्रामसेवक, सरपंच आणि संबंधित सदस्यांनी संगनमत करून शासनाची दिशाभूल केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला असून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. चौकशी न झाल्यास पंचायत समिती कार्यालयासमोर आंदोलन छेडण्याचा इशाराही तक्रारदारांनी दिला आहे.

दरम्यान, गटविकास अधिकारी विजय गायकवाड यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत विस्तार अधिकारी एस. ए. कोटे यांना सखोल चौकशी करून सात दिवसांच्या आत अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे चौकशी अहवालात नेमके काय निष्पन्न होते, याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *