स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत ९८८ मतदार बजावणार मतदानाचा हक्क

१८ जून रोजी मतदान; २९ मतदान केंद्रांवर व्यवस्था पूर्ण

यशश्री अपडेट्स | धाराशिव प्रतिनिधी

उस्मानाबाद-लातूर-बीड स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणुकीसाठी १८ जून २०२६ रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मतदान होणार आहे. या निवडणुकीत एकूण ९८८ मतदार मतदानाचा हक्क बजावणार असून त्यामध्ये ४९९ पुरुष व ४८९ महिला मतदारांचा समावेश आहे.

धाराशिव, लातूर आणि बीड या तीन जिल्ह्यांतील जिल्हा परिषद, नगरपरिषद, नगरपंचायत व महानगरपालिकेतील सदस्य या निवडणुकीत मतदान करणार आहेत.

निवडणुकीसाठी धाराशिवमध्ये ८, लातूरमध्ये १० आणि बीडमध्ये ११ अशी एकूण २९ मतदान केंद्रे स्थापन करण्यात आली असून सर्व केंद्रे संबंधित तहसील कार्यालयांमध्ये असतील.

मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडण्यासाठी ३२ मतदान केंद्राध्यक्ष व १२८ इतर मतदान अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच तीनही जिल्ह्यांत एकूण १४ झोनल अधिकारी कार्यरत राहणार आहेत.

मतदान कर्मचाऱ्यांना तीन टप्प्यांत प्रशिक्षण दिले जात असून पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. दुसरे प्रशिक्षण १२ व १३ जून रोजी, तर अंतिम प्रशिक्षण १७ जून रोजी होणार आहे.

मतदान केंद्रांवर देखरेख ठेवण्यासाठी बँक अधिकाऱ्यांची सूक्ष्म निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली असून एकूण ३८ सूक्ष्म निरीक्षक कार्यरत राहतील.

मतदान साहित्याचे वितरण १७ जून रोजी धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयातून करण्यात येणार आहे. मतदानानंतर साहित्य स्वीकृतीची प्रक्रिया धाराशिव येथील भाई उद्धवराव पाटील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत पार पडेल. निवडणुकीची मतमोजणी २२ जून २०२६ रोजी याच ठिकाणी होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *