भाजपच्या काही नगरसेवकांची आमदार रोहित पवार यांच्याशी भेट?; धाराशिवच्या राजकारणात चर्चांना उधाण

यशश्री अपडेट्स : धाराशिव | प्रतिनिधी
धाराशिव नगरपालिकेतील भाजपच्या पाच नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते रोहित पवार यांची भेट घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. शहराबाहेरील एका ठिकाणी ही भेट झाल्याची माहिती समोर येत असून, या भेटीबाबत गोपनीयता पाळण्यात आल्याचेही बोलले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आमदार रोहित पवार हे छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित आंदोलनाच्या पूर्वतयारीसाठी धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. त्यावेळी धाराशिव नगरपालिकेतील काही नगरसेवकांनी त्यांची भेट घेतल्याची चर्चा आहे. संबंधित नगरसेवकांनी, “आम्ही पूर्वीपासून तुमच्याच विचारांचे आहोत. काही कारणांमुळे भाजपमध्ये प्रवेश केला,” अशा स्वरूपाची भूमिका मांडल्याचेही सांगितले जात आहे.


धाराशिव नगरपालिकेत सध्या भाजपकडे स्पष्ट बहुमत असले, तरी पदवाटपात काही नगरसेवकांना डावलण्यात आल्याने पक्षांतर्गत नाराजी असल्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे या भेटीमागे नेमका काय उद्देश होता, याबाबत विविध तर्कवितर्कांना उधाण आले आहे. काहींच्या मते, हे भाजप नेतृत्वावर दबाव निर्माण करण्याचे राजकीय तंत्र असू शकते.


विशेष म्हणजे, संबंधित नगरसेवकांनी या भेटीसाठी स्वतःची वाहने न वापरता एका हॉटेल व्यावसायिकाच्या वाहनाचा वापर केल्याची चर्चा आहे. ही भेट बेंबळी गावाजवळ झाल्याचे सांगितले जात असून, संपूर्ण घटनाक्रम गुप्त ठेवण्याचा प्रयत्न झाल्याचेही बोलले जात आहे.


‘१७ जुलै’ची राजकीय चर्चा काय?


नगरपालिकेतील काही पदांच्या वाटपावेळी संबंधित नगरसेवकांना “१७ जुलैपर्यंतच जबाबदारी पार पाडायची आहे,” असे सांगण्यात आल्याची तसेच त्यासंदर्भात लेखी सहमती घेण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यामुळे १७ जुलै रोजी नेमके काय घडणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र, यासंदर्भात अधिकृतरीत्या कोणतीही पुष्टी झालेली नाही.

उपनगराध्यक्षपदासाठी हालचाली?


धाराशिव नगरपालिकेत नगराध्यक्षपदाइतकेच उपनगराध्यक्षपदालाही महत्त्व असल्याने या पदासाठी अनेक इच्छुक सक्रिय झाल्याची चर्चा आहे. शहराच्या राजकारणात प्रभाव निर्माण करण्यासाठी या पदाला विशेष महत्त्व असल्याचे मानले जाते. त्यामुळे आगामी राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर विविध स्तरांवर हालचाली सुरू असल्याचे बोलले जात आहे.


दरम्यान, गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजपची सत्ता असताना विरोधी पक्षाच्या प्रमुख नेत्याची भेट घेतल्याने धाराशिवच्या राजकारणात नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *