परंडा येथे माजी आमदार कै. पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त प्रतिमा पूजन, पुष्पवृष्टी व अभिवादन; कीर्तनातून तात्यांच्या व्यक्तिमत्त्वाला उजाळा
यशश्री अपडेट्स | परंडा :
माजी आमदार कै. ज्ञानेश्वर (तात्या) पाटील हे कोणत्याही संकटात खचून न जाता धाडसाने परिस्थितीचा सामना करणारे, मोकळ्या मनाचे, स्पष्टवक्ते आणि समाजाशी घट्ट नाळ जोडलेले नेतृत्व होते. राजकारणाच्या माध्यमातून समाजकारणाला प्राधान्य देत त्यांनी जनसामान्यांशी आपुलकीचे संबंध जपले. त्यांनी समाजाशी जोडलेली नाळ अधिक दृढ करण्याचे कार्य त्यांचे सुपुत्र रणजित पाटील आणि विश्वजित पाटील करीत आहेत, असे प्रतिपादन ह.भ.प. डॉ. जयवंत महाराज बोधले यांनी केले.
माजी आमदार कै. ज्ञानेश्वर (तात्या) पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त शनिवारी (दि. १०) परंडा शहरातील पाटील गल्ली येथे प्रतिमा पूजन, पुष्पवृष्टी आणि अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी तात्यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना आदरांजली वाहिली. तसेच संत माणकोजी महाराज बोधले यांचे वंशज ह.भ.प. डॉ. जयवंत महाराज बोधले यांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यांच्या कीर्तनातून कै. पाटील यांच्या व्यक्तिमत्त्वातील धाडस, स्पष्टवक्तेपणा, सामाजिक बांधिलकी आणि सर्वसामान्यांशी असलेले जिव्हाळ्याचे संबंध यांना उजाळा मिळाला.
संकटातही खंबीर राहणारे व्यक्तिमत्त्व

कीर्तनातून मार्गदर्शन करताना ह.भ.प. डॉ. जयवंत महाराज बोधले म्हणाले की, कै. ज्ञानेश्वर (तात्या) पाटील हे संकटसमयी कधीही खचून न जाणारे व्यक्तिमत्त्व होते. ते आपल्या विचारांमध्ये स्पष्ट होते. मनात एक आणि बोलण्यात दुसरे, असा त्यांचा स्वभाव नव्हता. ‘जे पोटात तेच ओठात’ या उक्तीप्रमाणे ते स्पष्टपणे आपली भूमिका मांडत असत. राजकारण करताना समाजकारणाचा धागा त्यांनी कायम जपला. त्यामुळे राजकीय, सामाजिक आणि आध्यात्मिक क्षेत्रांत त्यांचा मोठा जनसंपर्क होता.
तात्या पाटील आज देहरूपाने आपल्यात नसले, तरी त्यांच्या कार्याच्या आणि विचारांच्या माध्यमातून ते प्रत्येकाच्या स्मरणात आहेत. त्यांनी निर्माण केलेले सामाजिक संबंध, जनतेशी असलेली आपुलकी आणि समाजासाठी केलेले कार्य हेच त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे खरे वैभव आहे. त्यांच्या पश्चात रणजित पाटील आणि विश्वजित पाटील हे समाजाशी असलेली नाळ जपत असून, ती अधिक दृढ करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. पाटील परिवार तात्यांनी निर्माण केलेला वारसा आणि वैभव जपण्याचे कार्य करीत आहे, असेही बोधले महाराज यांनी नमूद केले.
मान्यवरांकडून प्रतिमा पूजन व अभिवादन
या कार्यक्रमाला जिल्हा परिषद माजी सदस्य सिद्धेश्वर पाटील, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाप्रमुख रणजित पाटील, युवा नेते विश्वजित पाटील, इंद्रजित पाटील, सत्यजित पाटील यांच्यासह पाटील परिवारातील सदस्य आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. सर्वांनी कै. ज्ञानेश्वर (तात्या) पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पवृष्टी केली आणि त्यांना अभिवादन केले.

यावेळी चिंचगाव (टे.) येथील परमपूज्य सरस्वती महाराज, खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, माजी खासदार रवींद्र गायकवाड, आमदार राजेंद्र राऊत, आमदार कैलास घाडगे-पाटील, आमदार प्रवीण स्वामी, माजी आमदार राहुल मोटे, माजी आमदार सुजितसिंह ठाकूर, माजी आमदार दयानंद गायकवाड, जिल्हा परिषद माजी सभापती दत्ता साळुंके, जिल्हा परिषद कृषी व पशुसंवर्धन सभापती भाऊसाहेब खरसडे, जिल्हा परिषद सदस्य धनंजय सावंत, रेवण ढोरे, अनिल खोचरे, ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. सुभाष मोरे,उपनगराध्यक्ष समरजित ठाकूर, जिल्हा परिषद माजी सभापती नवनाथ जगताप, पोलीस निरीक्षक आसाराम चोरमले, परंडा पंचायत समितीचे माजी सभापती गौतम लटके, परंडा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जयकुमार जैन, उपसभापती डॉ. रवींद्र जगताप, संचालक शंकर जाधव, ह.भ.प. बालाजी बोराडे, ह.भ.प. सतीश सूर्यवंशी आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
तात्यांच्या आठवणींना उजाळा
द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आयोजित या कार्यक्रमातून कै. ज्ञानेश्वर (तात्या) पाटील यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला. त्यांच्या कार्याचा आणि समाजाशी असलेल्या जिव्हाळ्याच्या संबंधांचा उल्लेख करत उपस्थितांनी त्यांना आदरांजली वाहिली. कीर्तन, प्रतिमा पूजन आणि अभिवादनाच्या माध्यमातून तात्यांच्या स्मृती जपण्याचा प्रयत्न यावेळी करण्यात आला. या कार्यक्रमाला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.
