धाराशिव भाजपमध्ये अंतर्गत संघर्ष उफाळला; काळे-ठाकूर भेटीनंतर राजकीय समीकरणे बदलणार?

यशश्री अपडेट्स | धाराशिव:

धाराशिव भाजपमधील अंतर्गत कलह आणि असंतोष आता उघडपणे चव्हाट्यावर आला आहे. आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्याकडून भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य ॲड. अनिल काळे यांचा झालेला कथित अवमान निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. या घटनेनंतर दुखावलेल्या निष्ठावंतांनी आता जिल्ह्यात संघटित होऊन जोरदार मोर्चेबांधणी आणि गाठीभेटींचे सत्र सुरू केले आहे. याच रणनीतीचा भाग म्हणून ॲड. अनिल काळे यांनी परंडा येथील भाजप संपर्क कार्यालयात माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीमुळे धाराशिव भाजपमधील ‘नाराज गटाची मोट’ बांधली जात असून जिल्ह्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

संघटन आणि निष्ठावंतांच्या सन्मानावर खलबते

ॲड. काळे यांनी माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांच्या भेटीचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत या संदर्भातील माहिती दिली. “पक्षाचे संघटन, कार्यकर्त्यांच्या भावना, आगामी उपक्रम आणि जनहिताच्या विविध विषयांवर सुजितसिंह ठाकूर यांच्याशी सविस्तर चर्चा झाली,” असे उभय नेत्यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केले आहे.

केवळ अनिल काळेच नव्हे, तर पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष संताजी चालुक्य यांच्यासह अनेक ज्येष्ठ व निष्ठावंत कार्यकर्ते सध्याच्या स्थानिक नेतृत्वाच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराज आहेत. ही नाराजी आता विविध व्यासपीठांवरून उघडपणे व्यक्त केली जात आहे.

‘हॉली डे’ पॉलिटिक्स आणि सरंजामशाहीवर जोरदार हल्लाबोल

भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना ॲड. अनिल काळे यांनी आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्यावर नाव न घेता घणाघाती टीका केली. ते म्हणाले,

“धाराशिव जिल्ह्यात आमदारांचा फक्त एककलमी कार्यक्रम सुरू आहे. त्यांच्या सरंजामशाही वृत्तीला आणि एकाधिकारशाहीला पक्षाचे अनेक कार्यकर्ते आता कंटाळले आहेत. निष्ठावंत कार्यकर्ते हे कोणाचे ‘लाभार्थी’ नाहीत; त्यांना केवळ पक्षात मान आणि सन्मान हवा आहे. आमचा संघर्ष आणि तपस्या अमूल्य आहे. पक्षाने कार्यकर्ते वाढवायला हवेत, स्वतःचे वैयक्तिक समर्थक नाही.”

आमदारांच्या राजकीय शैलीवर प्रहार करताना काळे पुढे म्हणाले, “संपत्तीच्या जोरावर त्यांचे केवळ ‘हॉली डे’ पॉलिटिक्स (सुट्टीकालीन राजकारण) सुरू असून, कार्यकर्त्यांवर घराणेशाही लादली जात आहे. पक्षाचा मूळ विचार बाजूला सारून वैयक्तिक समर्थक वाढवण्याचा हा प्रकार आता खपवून घेतला जाणार नाही.”

वरिष्ठ नेत्यांकडे तक्रारींचा पाढा: नाराज गट अॅक्शन मोडमध्ये

धाराशिवमधील भाजपचा नाराज आणि पीडित गट सध्या पूर्णपणे सक्रिय झाला आहे. जिल्ह्यात एकाधिकारशाहीविरोधात व्यापक मोट बांधण्याची मोहीम काळे यांनी हाती घेतली आहे. आगामी काळात या सर्व नाराज निष्ठावंत कार्यकर्त्यांचे एक प्रमुख शिष्टमंडळ मुंबईत जाऊन मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष आणि इतर केंद्रीय-राज्यस्तरीय वरिष्ठ नेत्यांची भेट घेणार असून स्थानिक परिस्थितीचा पाढा त्यांच्यासमोर वाचणार आहे.

सत्ताधारी गटाच्या हालचाली आणि आगामी राजकीय पेच

एकीकडे जिल्ह्यात निष्ठावंतांनी बंडाचे निशाण उभारलेले असताना निष्ठावंतांचा वाढता रोष आणि अंतर्गत गटबाजीमुळे धाराशिव भाजपमधील राजकीय वातावरण ऐन आगामी निवडणुकांच्या तोंडावर चांगलेच तापले असून, पक्षाचे वरिष्ठ नेतृत्व यावर काय तोडगा काढते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!