भूममध्ये छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य समाधान शिबिर; डॉ. तानाजी सावंत व अर्चना पाटील उपस्थित राहणार

यशश्री अपडेट्स|धाराशिव (प्रतिनिधी): परंडा विधानसभा मतदारसंघातील नागरिकांच्या विविध शासकीय कामांचा तातडीने आणि एकाच छताखाली निपटारा करण्याच्या उद्देशाने भूम-परंडा-वाशी विधानसभा मतदारसंघस्तरावरील ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर’ शनिवार, दि. १ ऑगस्ट २०२६ रोजी आयोजित करण्यात आले आहे. भूम येथील नगर रोडवरील ‘रामहारी मंगल कार्यालय’ येथे सकाळी १० वाजता हे शिबिर पार पडणार असून, परिसरातील नागरिकांनी या शिबिराचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

प्रमुख उपस्थिती व निमंत्रित मान्यवर

या समाधान शिबिराचे उद्घाटन आमदार प्रा. डॉ. तानाजीराव सावंत (विधानसभा सदस्य, परंडा) यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. अर्चनाताई पाटील उपस्थित राहणार असून, खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे.

धाराशिव जिल्ह्यातील सद्यस्थितीतील राजकीय वातावरण, कुरघोडीचे राजकारण आणि आमदार सावंत व अर्चना पाटील यांच्यातील जुने राजकीय मतभेद पाहता, हे तक्रार निवारण शिबिर शांततेत पार पडणार की राजकीय आखाडा बनणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. त्यातच खासदार ओमराजे यांची उपस्थिती या कार्यक्रमात महत्त्वाची मानली जात आहे.

कार्यक्रमास उपस्थित राहणारे इतर प्रमुख मान्यवर:

  • विधान परिषद सदस्य: बसवराज पाटील, विक्रम काळे, सतीश चव्हाण.
  • स्थानिक लोकप्रतिनिधी:
    • संयोगिता गाढवे (नगराध्यक्षा, नगर परिषद भूम)
    • जाकीर म. इस्माईल सौदागर (नगराध्यक्ष, नगर परिषद परंडा)
    • विजयाबाई गायकवाड (नगराध्यक्षा, नगर परिषद वाशी)
    • पूजा ठोंगे (सभापती, पंचायत समिती भूम)
    • अर्चना जाधव (सभापती, पंचायत समिती परंडा)
    • प्रणिता गायकवाड (सभापती, पंचायत समिती वाशी)
  • प्रशासकीय अधिकारी:
    • कीर्ती किरण पुजार (जिल्हाधिकारी, धाराशिव)
    • प्रियवंदा म्हाडदळकर (मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद धाराशिव)
    • रितू खोखर (पोलीस अधीक्षक, धाराशिव)

नागरिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन

विविध शासकीय योजनांशी संबंधित प्रलंबित प्रकरणे, महसुली सेवा तसेच नागरिकांच्या वैयक्तिक अडचणी व तक्रारींचे तत्परतेने निराकरण करण्यासाठी हे शिबिर अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.

या शिबिराचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन उपविभागीय अधिकारी (भूम) ज्योती चौहान, तहसीलदार (भूम) जयवंत पाटील, तहसीलदार (परंडा) निलेश काकडे आणि तहसीलदार (वाशी) प्रकाश म्हेत्रे यांनी संयुक्तपणे केले आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!