आजी-माजी सैनिक व अर्धसैनिक बल संघटनेच्या वतीने भव्य रॅली, शूर सैनिक व वीरनारींचा नागरी सत्कार
यशश्री अपडेट्स | परंडा
कारगिल विजय दिनानिमित्त परंडा येथे आजी-माजी सैनिक व अर्धसैनिक बल संघटनेच्या वतीने अत्यंत उत्साहात आणि राष्ट्रभक्तीपूर्ण वातावरणात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. कारगिल युद्धातील शहीद जवानांना अभिवादन, शूर सैनिक व वीरनारींचा नागरी सत्कार आणि प्रेरणादायी मनोगतांमुळे संपूर्ण परिसर देशभक्तीच्या रंगात रंगून गेला.
कार्यक्रमाची सुरुवात महाराणा प्रतापसिंह चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक या मार्गावर काढण्यात आलेल्या भव्य तिरंगा रॅलीने झाली. रॅलीनंतर छत्रपती शिवाजी महाराज चौकात कारगिल युद्धातील अमर शहीदांना मानवंदना अर्पण करण्यात आली. तिरंगा ध्वज अभिमानाने फडकवून उपस्थितांनी एकमुखाने राष्ट्रगीत गायले. त्यानंतर शहीद जवानांच्या प्रतिमेस पुष्पचक्र अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.
या कार्यक्रमात कारगिल युद्धात प्रत्यक्ष सहभाग घेतलेल्या शूर सैनिकांचा तसेच देशासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या वीर जवानांच्या वीरनारींचा शाल, श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह देऊन नागरी सत्कार करण्यात आला. उपस्थितांनी उभे राहून टाळ्यांच्या गजरात या वीरांना मानवंदना दिली.
यावेळी भाजप नेते तथा माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी उपस्थितांना संबोधित करताना कारगिल युद्धातील भारतीय सैनिकांच्या अतुलनीय शौर्याची आठवण करून दिली. ते म्हणाले, “२६ जुलै १९९९ हा दिवस भारतीय लष्कराच्या इतिहासातील सुवर्ण आणि अभिमानाचा दिवस आहे. कारगिलच्या सुमारे १८ हजार फूट उंचीवरील बर्फाच्छादित पर्वतरांगांमध्ये पाकिस्तानी घुसखोरांनी भारतीय भूमीवर अतिक्रमण केले होते. उणे ६० अंश सेल्सिअस तापमान, प्रतिकूल हवामान आणि शत्रू उंचावर असतानाही भारतीय सैनिकांनी अदम्य धैर्य, शौर्य आणि देशभक्तीच्या बळावर ‘ऑपरेशन विजय’ यशस्वी करून भारताचा विजय निश्चित केला.”
यावेळी त्यांनी कारगिल युद्धातील शूरवीर कॅप्टन विक्रम बत्रा, कॅप्टन मनोज कुमार पांडे, ग्रेनेडिअर योगेंद्रसिंह यादव यांच्यासह मातृभूमीसाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या सर्व वीर जवानांना त्रिवार अभिवादन केले. “तिरंग्याची शान अबाधित ठेवण्यासाठी आपल्या सैनिकांनी प्राणांची आहुती दिली. त्यांचे बलिदान देश कधीही विसरणार नाही,” असे भावनिक उद्गारही त्यांनी काढले.
या गौरव सोहळ्यास सोनारीचे भैरवनाथ गुरु गादीचे महंत पीर योगी शामनाथ महाराज, शिवसेना (शिंदे गट) जिल्हाप्रमुख दत्तात्रय साळुंके, शिवसेना (ठाकरे गट) जिल्हाप्रमुख रणजित ज्ञानेश्वर पाटील, जिल्हा परिषद सदस्य प्रतिनिधी राहुल डोके, पंचायत समिती सभापती प्रतिनिधी आण्णासाहेब जाधव यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
तसेच नगरसेवक रमेशसिंह परदेशी, देवानंद टकले, डॉ. आनंद मोरे, विशाल देवकर, पांडुरंग कोकणे, दीपक ओव्हाळ, तालुक्यातील आजी-माजी सैनिक, विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी आणि राष्ट्रप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपक्रमशील शिक्षक व शाहीर शरद नवले यांनी केले.
देशासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या शूरवीरांच्या स्मृती जागवणारा आणि राष्ट्रभक्तीची भावना अधिक दृढ करणारा हा कार्यक्रम अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
