‘पिकासो’ अॅपचा सायबर सापळा; परंड्यातील तरुणाच्या खात्यातून ४० हजार रुपये गायब!

यशश्री अपडेट्स | धाराशिव
डिजिटल युगात सायबर गुन्ह्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून आता परंडा तालुक्यातही अशाच एका धक्कादायक फसवणुकीची घटना उघडकीस आली आहे. ‘पिकासो’ (Picasso) अॅपमध्ये तांत्रिक हेराफेरी करून एका तरुणाच्या बँक खात्यातून तब्बल ४० हजार रुपये लंपास करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी परंडा पोलीस ठाण्यात माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फसवणूक झालेल्या तरुणाचे नाव नितीन नानासाहेब गवारे (वय ३१, रा. जवळा-नि., ता. परंडा) असे आहे.


कशी झाली फसवणूक?


पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ५ जून २०२६ रोजी दुपारी १.३० वाजण्याच्या सुमारास आरोपी मुकेशकुमार हरदवारी लालगाव याने फिर्यादीच्या मोबाईल नंबरचा गैरवापर करत ‘पिकासो’ अॅपमध्ये बेकायदेशीर तांत्रिक छेडछाड केली. या माध्यमातून आरोपीने नितीन गवारे यांच्या बँक खात्याचा अॅक्सेस मिळवून त्यांच्या खात्यातील ४० हजार रुपये स्वतःच्या खात्यावर वळवले.
बँक खात्यातून पैसे वजा झाल्याचा संदेश मोबाईलवर आल्यानंतर गवारे यांना फसवणुकीची माहिती मिळाली.


पोलिसांत गुन्हा दाखल


घडलेल्या प्रकारानंतर नितीन गवारे यांनी परंडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या प्रथम खबरेवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३१८(४) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियमातील कलम ६६(सी) व ६६(डी) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास परंडा पोलीस आणि सायबर सेल करत आहेत.


नागरिकांसाठी महत्त्वाचे आवाहन


सायबर गुन्ह्यांपासून बचावासाठी नागरिकांनी कोणतेही अनोळखी अथवा संशयास्पद अॅप डाउनलोड करू नयेत. तसेच OTP, बँक खाते क्रमांक, पासवर्ड किंवा इतर गोपनीय माहिती कोणाशीही शेअर करू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *