प्राथमिक शिक्षक भरतीत SEBC प्रवर्गासाठी जागा राखीव ठेवा; पात्र उमेदवारांवर अन्याय होऊ देऊ नका

जिल्हा परिषद सदस्या सौ. सविता विकास तळेकर यांची मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे लेखी मागणी

यशश्री अपडेट्स | धाराशिव

पवित्र प्रणालीद्वारे राबविण्यात येत असलेल्या प्राथमिक शिक्षक भरती प्रक्रियेत धाराशिव जिल्ह्यात SEBC (सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्ग) उमेदवारांसाठी एकही जागा उपलब्ध नसल्याचा गंभीर मुद्दा समोर आला आहे. त्यामुळे या प्रवर्गातील पात्र, गुणवंत आणि भरती प्रक्रियेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद सदस्या सौ. सविता विकास तळेकर आणि वाशी पंचायत समितीच्या सभापती प्रणिता प्रवीण गायकवाड यांनी धाराशिव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियवंदा महाडदाळकर यांना लेखी निवेदन देऊन SEBC प्रवर्गासाठी नियमानुसार आवश्यक जागा राखीव ठेवण्याची मागणी केली आहे.

धाराशिव जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षक भरतीसाठी पवित्र प्रणालीअंतर्गत प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीनुसार EDUCATION OFFICER PRIMARY DHARASHIV (Primary) – Without Interview या पदासाठी एकूण १४५ रिक्त पदे जाहीर करण्यात आली आहेत. मात्र आरक्षणनिहाय पदांचे वर्गीकरण पाहता SEBC प्रवर्गासाठी एकही जागा उपलब्ध नसल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे आरक्षणाच्या तरतुदींच्या अंमलबजावणीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, संबंधित उमेदवारांना न्याय मिळण्याबाबत शंका व्यक्त केली जात आहे.

सध्या राज्यभर शिक्षक भरती प्रक्रियेला वेग आला असून, शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (TAIT) उत्तीर्ण झालेल्या तसेच पवित्र प्रणालीमध्ये नोंदणी केलेल्या हजारो उमेदवारांनी गुणवत्तेच्या आधारे शिक्षक होण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. धाराशिव जिल्ह्यातील अनेक SEBC उमेदवारांनीही ही प्रक्रिया पूर्ण केली असून, त्यांना आरक्षणाच्या तरतुदीनुसार संधी मिळणे अपेक्षित आहे. परंतु SEBC प्रवर्गासाठी जागाच उपलब्ध नसल्याने या उमेदवारांना प्रत्यक्ष भरती प्रक्रियेतून वंचित राहावे लागत असल्याचा मुद्दा निवेदनात मांडण्यात आला आहे.

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, भरती प्रक्रियेतील रिक्त पदांचा आरक्षणनिहाय फेरआढावा घेऊन SEBC प्रवर्गासाठी नियमानुसार आवश्यक पदसंख्या निश्चित करण्यात यावी. तसेच ती पदे सध्याच्या भरती प्रक्रियेत तातडीने समाविष्ट करण्यात यावीत, जेणेकरून पात्र व गुणवंत उमेदवारांवर अन्याय होणार नाही.

याबाबत बोलताना सौ. सविता विकास तळेकर म्हणाल्या की, “शासनाने जाहीर केलेल्या आरक्षण धोरणाचा लाभ सर्व पात्र प्रवर्गांना मिळणे आवश्यक आहे. SEBC प्रवर्गासाठी एकही जागा उपलब्ध नसणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. प्रशासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घेऊन या प्रवर्गासाठी आवश्यक जागा उपलब्ध करून द्याव्यात.”

त्यांनी पुढे सांगितले की, हा प्रश्न केवळ धाराशिवपुरता मर्यादित नसून, आरक्षणाच्या अंमलबजावणीशी संबंधित महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यामुळे या मागणीची दखल घेऊन आवश्यक कार्यवाही शासन स्तरावर करण्यात यावी. SEBC प्रवर्गातील उमेदवारांना न्याय मिळावा यासाठी हा विषय संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोरही मांडण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियवंदा महाडदाळकर यांना निवेदन सादर करताना जिल्हा परिषद सदस्या सौ. सविता विकास तळेकर आणि वाशी पंचायत समितीच्या सभापती प्रणिता प्रवीण गायकवाड उपस्थित होत्या.

दरम्यान, SEBC प्रवर्गातील उमेदवारांनीही या मागणीला पाठिंबा दर्शविला असून, भरती प्रक्रियेत आरक्षणाचा योग्य समावेश करून संधीची समानता राखावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. आता जिल्हा परिषद प्रशासन आणि शिक्षण विभाग या निवेदनाची दखल घेऊन काय निर्णय घेतात, याकडे संबंधित उमेदवारांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!